आयुक्तांच्या प्रस्तावावरून सोलापूर महापालिकेत कलगीतुरा

आयुक्तांच्या प्रस्तावावरून सोलापूर महापालिकेत कलगीतुरा

सोलापूर :  महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांना शासनाकडे परत पाठविण्याचा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक तथा उपमहापौर राजेश काळे व अविनाश बोमड्याल यांनी दाखल केला आहे. त्यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा सुरु झाला आहे. सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसीला धुडकावून लावत, नोटीस देण्याचा अधिकार शहराध्यक्षाला आहे, आपल्याला नाही, असे सुनावत काळे यांनी तीन पानी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. 

सभागृह नेते श्री. करली यांनी श्री. काळे आणि श्री. बोमड्याल यांना आज शुक्रवारी सकाळी नोटीस बजावली. विशेष म्हणजे श्री. काळे यांनी केवळ अर्ध्या तासामध्ये या नोटीसीला उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर, महापालिकेतील पदाधिकार्यांनी वेळीच योग्य ते निर्णय घेतले असते तर मला पत्रक काढण्याची वेळ आली नसती, असा टोलाही लगावला आहे. प्रसारमाध्यमातून आलेल्या बातम्यांच्या आधारे पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली असती तर त्याचे चांगले परिणाम दिसले असते, असेही श्री. काळे यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे. नोटीस आणि खुलाशावरून महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्येच आता जुंपली असून याबाबत भाजपचे श्रेष्ठी काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, आयुक्तांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला प्रस्ताव हा वैयक्तिक आहे. त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी केले आहे. प्रशासनाकडून विशेषतः आयुक्तांकडून चांगले काम होत असताना त्यांना विशिष्ट हेतूने टार्गेट करणे योग्य नाही. कुणी जाणीवपूर्वक असा प्रकार करत असेल तर त्याला निश्चित जाब विचारण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. आलेल्या प्रस्तावाबाबत काय निर्णय घ्यायचा हे पक्षाच्या बैठकीत निश्चित ठरणार आहे, मात्र आपत्तीच्या काळात भाजप आयुक्तांच्या विरोधात आलेल्या या प्रस्तावाचे समर्थन करणार नाही, असेही ते म्हणाले.


अधिकाऱ्यांकडून कसे काम करून घ्यायचे ही लोकप्रतिनिधींची कला आहे. शहरात आरोग्याची भयानक स्थिती असताना अशा प्रकारचा प्रस्ताव आणून प्रशासनाचे खच्चीकरण करणे योग्य नाही. या प्रस्तावाचे कॅंाग्रेस कधीही समर्थन करणार नाही, उलट प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करेल.
- चेतन नरोटे, गटनेता, कॅंाग्रेस

लोकप्रतिनिधी व प्रशासनात समन्वय नसेल तर चर्चेतून मार्ग काढता येऊ शकतो. पण विनाकारण विशिष्ट हेतुने राजकारण करून अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नाही. आयुक्तांना परत पाठविण्याचा प्रस्ताव आला असला तरी, त्यास सत्ताधारी पक्षातूनच विरोध होणार हे शंभर टक्के सत्य आहे आणि प्रस्ताव देणार्यांचे हसे होईल.
- आनंद चंदनशिवे, गटनेता, वंचित बहुजन आघाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com