
चौपाटीही होणार बंद?
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये चौपाटी सुरू असतात. या ठिकाणी गर्दी होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चौपाटी बंद करण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. ग्राहकांना ऑनलाइन बॅंकिंगचा वापर करावा. ग्राहकांनी शक्यतो बॅंकेत जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सोलापूर : कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ नये यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, वॉटरपार्क, वस्तुसंग्रहालय, शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालय व व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मनोरंजनाची ठिकाणे, पर्यटन केंद्रे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज काढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद करण्याबाबतचाही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
हेही वाचा - विद्यापीठाच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत थांबविल्या
निवेदने ई-मेलवर (collectorsolapur@gmail.com ) पाठवा, अत्यावश्यक काम असेल तरच सरकारी कार्यालयात जा अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आज दिल्या आहेत. महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला होता. आज काढलेल्या आदेशामुळे आता ग्रामीण भागातीलही शाळा बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. आदेशाचे पालन न केल्यास त्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 च्या वापर करून हे आदेश काढण्यात आले आहेत.
हेही वाचा - भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडीची उत्सुकता
10 वी व 12 वीच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी आस्थापनांमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यानुसार निधी मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.