सोलापूरच्या शेतकऱ्याचं असंही पवार प्रेम ! स्वनिर्मित द्राक्ष वाणाचं "शरद सीडलेस' नामकरण 

प्रकाश सनपूरकर 
Saturday, 7 November 2020

नान्नज येथील प्रगतीशील शेतकरी, कृषिभूषण दत्तात्रय काळे व सारंग काळे यांनी शेतीचे प्रयोग, यशकथा यांच्या पलीकडे जाऊन संशोधित द्राक्ष वाण निर्मितीचा आगळावेगळा वारसा चालवला आहे. द्राक्ष वाणाच्या संदर्भात त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या द्राक्ष शेतीमध्ये नवी ओळख निर्माण करणारे आहे. 

सोलापूर : नान्नज येथील प्रगतीशील शेतकरी, कृषिभूषण दत्तात्रय काळे व सारंग काळे यांनी शेतीचे प्रयोग, यशकथा यांच्या पलीकडे जाऊन संशोधित द्राक्ष वाण निर्मितीचा आगळावेगळा वारसा चालवला आहे. द्राक्ष वाणाच्या संदर्भात त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या द्राक्ष शेतीमध्ये नवी ओळख निर्माण करणारे आहे. 

उत्तर सोलापूर तालुका दुष्काळी भाग असला तरी काळे कुटुंबीयांनी केलेल्या अविरत परिश्रमाच्या द्राक्ष शेतीमुळे या भागातील शेतीचा चेहरामोहरा बदलला आहे. 
नान्नजचे द्राक्ष पंडित नानासाहेब काळे यांनी 1958 मध्ये द्राक्ष शेतीचे काम सुरू केले. नानासाहेबांनी बारामती येथून सीडलेस वाणाची काडी आणून त्याची लागवड केली. 
त्यांनी ही जात नान्नजच्या द्राक्षमळ्यात आणली. त्यांचं पाहून त्या भागात बऱ्याचजणांनी द्राक्ष शेती सुरू केली. प्रमुख द्राक्ष उत्पादन घेणारा तालुका म्हणून उत्तर तालुका ओळखला जाऊ लागला. 

द्राक्षाच्या घडांपैकी काही घड असे आहेत ज्यांचे मणी लांबीने जास्त आहेत. हे जास्त लांबीचे घड काही विशिष्ट वेलीला लागतात, हे निरीक्षण नानासाहेबांनी केले. तेव्हा जवळपास दोन - तीन वर्ष सलग अभ्यास करत ही वेगळी जात असल्याचे निष्कर्ष काढत हे वाण विकसित केले. हीच ती "सोनाका' द्राक्ष. त्यांनी या गोड द्राक्षाला त्यांचे वडील सोनबा काळे यांचे नाव दिले. आज ही द्राक्षे देश व देशाबाहेरील बाजारपेठेत दबदबा राखून आहेत. 

नंतर सरकारने नानासाहेबांची युरोप दौऱ्याला जाणाऱ्या एका टीममध्ये निवड केली. तेव्हा तेथून आणलेले वाण विकसित करून त्यांनी युरोपमधून आणलेल्या जांभळ्या द्राक्षाच्या वाणाला शरद पवार यांचे शरद सीडलेस हे नाव दिले. 

पुढे द्राक्षमहर्षी नानासाहेब काळे यांचा वारसा त्यांचे पुत्र कृषिभूषण दत्तात्रय काळे व सारंग काळे यांनी पुढे चालवला आहे. आजही नान्नजच्या सोनाका फार्मवर द्राक्षाच्या नवीन जाती तयार करण्याचे संशोधनाचे काम सुरू असते. दत्तात्रय काळे यांनी त्यांच्या मातोश्री सरिता काळे यांच्या नावे काळ्या रंगाच्या लांबट द्राक्षमणी असलेल्या सरिता सीडलेस या वाणाची निर्मिती व नानासाहेब काळे यांच्या नावाने पर्पल सीडलेस या नावाचे विकसित वाण तयार केले. या दोन्ही वाणांना नुकताच पीकवाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडून स्वामित्व हक्क प्राप्त झाला आहे. एकाच वेळी द्राक्षांमध्ये दोन वाणांना स्वामित्व हक्क मिळवणारे दत्तात्रय काळे हे देशातले पहिले शेतकरी ठरले. आता ते "दनाका' म्हणजे दत्तात्रय नानासाहेब काळे या वाणाच्या नोंदणीसाठी प्रयत्न करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapurs Farmer produced Sharad Seedless Grape Variety