सोयाबीनच्या बियाण्याने शेतकऱ्यांना दिला दगा; दुबार पेरणीचे संकट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज करावा 
ज्या शेतकऱ्यांचे पेरलेले सोयाबीन उगवले नाही, त्या शेतकऱ्यांनी तक्रारीचा अर्ज, बी खरेदीच्या पावतीची झेरॉक्‍स, टॅग व इतर माहिती बार्शी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करावी. 
- श्रीधर दीक्षित, कृषी पर्यवेक्षक, उपळे, ता. बार्शी 

मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) : बार्शी तालुक्‍यात रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. मात्र पेरलेले सोयाबीनचे बियाणे वांझ निघाल्याने झाडी, उपळे, पिंपरी (सा) येथील शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभा राहिले आहे. 
कोरोनामुळे राज्यातील शेतकऱ्यांच संपूर्ण अर्थचक्र बिघडले आहे. बियाणे, खत खरेदी, पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. बॅंका बळीराजाला कर्ज द्यायला तयार नाहीत. आशा भीषण संकटात सापडलेल्या बळीराजाने काळ्या आईची ओटी भरण्यासाठी घरच्या लक्ष्मीला लंकेची पार्वती करीत सोयाबीन बियाणे खरेदी केले आणि पेरणी केली. मात्र सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने खरिपाच्या सुरवातीलाच मोठा फटका बसला आहे. झाडी येथील शेतकरी प्रशांत सांगुळे, वैजीनाथ सांगुळे, अमोल शिंदे, कपिल सांगुळे यांनी महाबीज कंपनीचे बी पेरले ते उगवले नाही. उपळे येथील सुधाकर पवार, अमोल बुरगुटे, नेताजी चव्हाण, श्रीराम शेळके, मुकूंद बुरगुटे, राहुल शेळके यांनी ग्रीन गोल्ड व महाबीजचे बी पेरले ते उगवले नाही. पिंपरी (सा) येथील अर्जुन सुतार यांनी कृषीधनचे सोयाबीन पेरले तेही उगवले नाही, अशा तक्रारी विविध गावातून येत आहेत. सदर कंपनीकडे शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कृषी खाते, तालुका व जिल्हा प्रशासन बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर काय कारवाई करणार व पंचनामे करून कोणत्या स्वरूपाची आर्थिक मदत मिळवून देणार याकडे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

चार एकरातील सोयाबीन उगवले नाही 
गतवर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने सोयाबीन उत्पादन कमी झाले. चालू खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे चार एकरात महाबीज कंपनीचे सोयाबीनचे बी खरेदी करून पेरणी केली. मात्र सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. त्यामुळे कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. प्रशासनाने योग्य ती दखल घेत तात्काळ पंचनामे करून बोगस बी विकणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी व आम्हाला आर्थिक नुकसानभरपाई मिळवून द्यावी. 
- वैजीनाथ सांगुळे, शेतकरी, झाडी, ता. बार्शी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soybean seeds betrayed farmers double sowing crisis