सीना-भोगावती जोड कालव्याला द्यावी गती :  मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अपेक्षा

seena Bhogavati Jod Kalva
seena Bhogavati Jod Kalva

वाळूज (ता.मोहोळ जि. सोलापूर ) : भोगावती नदी परिसरातील मोहोळ तालुक्‍याचा उत्तर भाग, बार्शी तालुक्‍यातील वैराग परिसर आणि माढा तालुक्‍याचा पूर्व भागातील 11 हजार 250 हेक्‍टर क्षेत्र कायमस्वरूपी ओलिताखाली येण्यासाठी सीना नदीतून भोगावती नदीत पाणी सोडण्यासाठी सीना-भोगावती जोड कालवा व्हावा, अशी तिन्ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांची गेल्या तीस ते चाळीस वर्षापासूनची मागणी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याकडे लक्ष देऊन, या योजनेला गती द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. 

मोहोळ, माढा व बार्शी तालुक्‍यातील भोगावती नदी परिसरातील शेती व सपाट भूभागाची, काळी कसदार व सुपीक आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कृषी नियोजन मागील दहा वर्षांपासून चुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पावसाच्या प्रमाणात सातत्याने घट झाल्यामुळे येथील शेती अत्यल्प प्रमाणात हंगामी बागायती स्वरूपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत कमी उत्पन्नावर गुजराण करावी लागते. भीमा-सीना जोडकालव्याद्वारे मोहोळ, माढा तसेच दक्षिण सोलापूर तालुक्‍याचा सीना नदी परिसरातील शेतीचा भाग ओलिताखाली आला आहे. त्यामुळे सीना परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. या जोडकालव्यातील पाणी सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे भोगावती नदीमध्ये सोडून नदीवरील इर्ले, तडवळे, देगाव, डिकसळ व भोयरे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात सोडण्यात यावे. हे बंधारे 512.4887 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे आहेत. 

या  पाण्यामुळे बार्शी तालुक्‍यातील इर्ले, तडवळे (या.), यावली, मुंगशी (वा.) व मोहोळ तालुक्‍यातील मनगोली, वाळूज (दे.), भैरववाडी, देगाव (वा.), मसले चौधरी, डिकसळ, नरखेड व भोयरे या गावचे शासकीय नियमानुसार अंदाजे 11 हजार 250 एकर क्षेत्र ओलिताखाली आणता येईल. त्यामुळे भोगावती नदी परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावेल. या जोडकालव्यामुळे नदी परिसरातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. रिधोरे (ता. माढा) ते तडवळे (ता. बार्शी) हे अंतर 24 किलोमीटर आहे. सीना नदीवरील बंधाऱ्याची जमीन पातळी 1575 फूट आणि भोगावती नदीवरील इर्ले व तडवळे येथील जमीनपातळी 1544 फूट एवढी आहे. त्यामुळे सीना नदीवरील उजनीचे पाणी भोगावती नदीत नैसर्गिक उताराने आणने सोपे आहे. त्यामुळे इर्ले ते भोयरे दरम्यानच्या पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये 0.50 टीएमसी पाणीसाठा होऊन 11 हजार 250 हेक्‍टर एवढे क्षेत्र ओलिताखाली येईल. भोगावती नदीवरील तडवळे ते भोयरे दरम्यान चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये 0.45 टीएमसी पाणी साठवता येईल. त्यामुळे 11 हजार 250 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. उजनी धरणाची उंची अंतरवक्र लोखंडी तीन फूट उंचीचे दरवाजे टाकल्यामुळे वाढली असून धरणात सात टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. या पाण्यातील फक्त अर्धा टीएमसी पाणी सीना-भोगावती जोडकालव्यासाठी सोडण्यात यावे. धरणात क्षमतेपेक्षा जास्त झालेले पाणी भीमा नदीत न सोडता भीमा-सीना जोडकालव्याद्वारे सीना नदीवरील बंधारे व सीना-भोगावती जोडकालव्याद्वारे भोगावती नदीत सोडल्यास शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोगात आणता येईल. मात्र त्यासाठी सीना-भोगावती जोडकालवा होणे गरजेचे आहे. त्यामुळे माढा बार्शी व मोहोळ तालुक्‍याचा उत्तर भाग तालुक्‍यातील वैरागच्या पश्‍चिम भागात हरितक्रांती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या योजनेला गती देण्याची मागणी होत आहे. 

जोडकालव्याची ठळक वैशिष्ट्ये 

  •  सीना नदीवरील रिधोरे बंधारा तळांक : 474.08 मी 
  •  रिधोरे ते तडवळे बंधारा लांबी 14 किमी 
  •  बोगदा 12.50 किमी 
  •  कालवा अंदाजे 2 ते 3 किमी 

संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com