
महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रीडा विद्यापीठ होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. खास क्रीडा विषयाला धरुन शासन विद्यापीठ करत आहे, याचा फायदा महाराष्ट्रातील असंख्य खेळाडूंना होणार आहे.
सोलापूर : महाराष्ट्रात सर्वप्रथम क्रीडा विद्यापीठ होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. खास क्रीडा विषयाला धरुन शासन विद्यापीठ करत आहे, याचा फायदा महाराष्ट्रातील असंख्य खेळाडूंना होणार आहे. मात्र, या समितीमध्ये 50 टक्के खेळाडू असावेत, तसेच राज्याच्या ग्रामीण भातील तज्ज्ञ मार्गदर्शकाचा समावेश करून न्याय द्यावा अशी मागणी राज्यातील क्रीडा क्षेत्रातून होऊ लागली आहे.
अर्जुनवीर काका पवार म्हणाले, की या विद्यापीठ स्थापनेच्या समितीमध्ये 50 टक्के खेळाडू असावेत, ज्यांना खेळाची, खेळाडूंची व्यथा माहिती असावी. मग तो खेळाडू कोणत्याही खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू असला पाहिजे. निलेश कुलकर्णी हे क्रिकेटपटू वगळता कोणाचाही खेळाशी संबंध नसलेले अधिकारी घेण्यात आले आहेत. अनेक तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय खेळाडू इतर राज्ये पगार देऊन आपल्याकडे घेत आहेत. धनराज पिल्ले सारखा खेळाडू गुजरातने घेतला.
राज्यातील सर्व भागांना समान न्याय दिला जाईल
आंतराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठामध्ये कोणकोणते विभाग असावेत, या विभागाचे प्रमुख कोण असावेत यांची पात्रता काय असावी त्याचबरोबर कुलगुरू कोण असावेत याचे निकष ठरविण्यासाठी तसेच क्रीडा विद्यापीठात कोणते अभ्यासक्रम असावेत याचा विचार विनिमय करण्यासाठी तसेच शिफारसी करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाची ही समिती स्थापित करण्यात आलेली आहे. यामार्फत राज्यातील सर्व भागांना समान न्याय दिला जाईल.
- ओमप्रकाश बकोरिया,
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे
क्रीडा विद्यापीठ ही स्तुत्य बाब
क्रीडा विषयक शासन इतका मोठा निर्णय घेत आहे ही स्तुत्य बाब आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात येत आहे. सदस्य समितीत घेण्यात आलेले व्यक्ती अगोदरच कोणत्यातरी पदावर आहेत. त्यामुळे सदर समितीमध्ये किमान 50 टक्के खेळाडू घेण्यात यावेत तरच क्रीडा विद्यापीठ ही संकल्पना खरोखर खेळासाठी होत आहे ही भावना जनमानसात रुजेल.
- काकासाहेब पवार
अर्जुनवीर, कुस्ती मार्गदर्शक
ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवलेली
राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन होत आहे ही आनंदाची बाब आहे; परंतु जी समिती स्थापन करण्यात आली, त्यामध्ये ग्रामीण भागातील क्रीडा मार्गदर्शकांचाही समावेश असावा, बरेच मार्गदर्शक कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती रुजवली असून या माध्यमातून अनेक राज्य, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचा यात समावेश करून ग्रामीण भागाला न्याय द्यावा.
- डॉ. अविनाश बारगजे
आंतरराष्ट्रीय तायक्वांदो मार्गदर्शक
तज्ज्ञ संघटक, खेळाडूंचा समावेश गरजेचा
ग्रामीण महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभ्यासू तज्ज्ञ संघटक खेळाडूंचा समावेश गरजेचा आहे. ही समिती पंधरा सदस्यांची असावी. सर्व क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रातील इनडोअर व आउटडोअर क्रीडा प्रकारातील तज्ज्ञ तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्राचा अभ्यासक्रमाची जाण असणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असावा. तसेच अनुभवी संघटक मार्गदर्शकांचा या समितीत समावेश असावा. जेणेकरून परिपूर्ण अशा पद्धतीचे नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ निर्माण करता येईल.
- प्रा. सचिन गायकवाड,
सिनेट सदस्य, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर