सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यास  सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी 

प्रमोद बोडके
बुधवार, 17 जून 2020

विद्यार्थ्यांचा प्रश्‍न सुटला 
नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र यासह विविध कागदपत्रे आवश्‍यक असतात. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्र महत्त्वाची आहेत. ही केंद्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र पुढे होणारी गर्दी टाळण्याचे मोठे आव्हान सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्र चालकांसमोर असणार आहे. 

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्र मार्चपासून बंद करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यास सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे.

ही परवानगी देत असताना काही महत्त्वाच्या अटी व नियम सर्व सेतू चालक व महा ई सेवा केंद्र चालकांना पाळावे लागणार आहेत. सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्रातील सामग्री, बायोमेट्रिक उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्‍यक आहे. केंद्रातील चालक व ऑपरेटर यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्‍यक आहे. वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, ऑपरेटर यांनी नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

ऑपरेटर व केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी पूर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढण्या पुरताच तोंडावरील मास्क काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व्यवस्थापक, टेबल ऑपरेटर, नागरिक यांच्यात एक मीटरचे शारीरिक अंतर असणे आवश्‍यक आहे. सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्रात अपॉईंटमेंट शिवाय येण्याची नागरिकांना परवानगी देऊ नये. नागरिकांना सामाजिक अंतर निश्‍चित करण्यासाठी योग्य अंतरासह उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे. सेतू व महा-ई-सेवा केंद्र देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे, सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्रात शिबिरे घेऊ नये अशा सूचनाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To start Setu Kendra, Maha-e-Seva Kendra Permission of the District Collector of Solapur