
एका गुन्ह्याच्या घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी (ता. माढा) येथे गेलेल्या सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकावर दगडफेक करण्यात आली असून, त्यामध्ये गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
कुर्डुवाडी (सोलापूर) : एका गुन्ह्याच्या घटनेतील संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी (ता. माढा) येथे गेलेल्या सोलापूर ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकावर दगडफेक करण्यात आली असून, त्यामध्ये गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. नेमके कितीजण जखमी झाले आहेत हे समजू शकले नाही. ही घटना शुक्रवारी (ता. 8) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, पोलिस हवालदर धनाजी गाडे, पोलिस हवालदार मोहन मनसावले, पोलिस शिपाई अक्षय दळवी, पोलिस शिपाई धनराज गायकवाड व चालक पोलिस शिपाई समीर शेख यांचे पथक सांगोला येथे घडलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी बारलोणी येथे पोहोले. हे पाहताच त्या परिसरातील संबंधितांनी पोलिस गाडीवर दगडफेक सुरू केली. त्यांच्या दगडफेकीत पोलिस पथकातील कर्मचारी जखमी झाले असल्याचे समजते. घटना समजताच पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, इतर पोलिस अधिकारी व पोलिस पथके बारलोणी गावात पोचली.
संपादन : श्रीनिवास दुध्याल