अंगणवाडी मदतनीस महिलेची मुलगी झाली पोलिस उपनिरीक्षक

अण्णा काळे
शनिवार, 21 मार्च 2020

वांगी नं. 2 (करमाळा) येथील संध्याराणी दत्ताञय देशमुख ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये राज्यात 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. आपली मुलगी पीएसआय झाली यावर तीची आई निर्मला देशमुख ‘सकाळ’शी बोलताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंद अश्रुंचा बांध फुटला होता.

करमाळा (सोलापूर) : संध्याराणी पोटात होती तेव्हाच पतीचे निधन झाले. पोटात लेकरू वाढत असताना पतीचे निधन हे दुःख ज्याच्या नशीबी येते यापेक्षा जगात दुसरे मोठे दुःख असु शकत नाही. हे सारं दु:ख लेकरांकडे बघुन पचवत मोठे कष्ट केले. या कष्टाचे चिज झाले, अशी प्रतिक्रिया पोलिस उपनिरीक्षक झालेल्या संध्याराणी देशमुख हीची आई निर्मला दत्तात्रय देशमुख यांनी दिली आहे.
वांगी नं. 2 (करमाळा) येथील संध्याराणी दत्ताञय देशमुख ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत मुलींमध्ये राज्यात 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. आपली मुलगी पीएसआय झाली यावर तीची आई निर्मला देशमुख ‘सकाळ’शी बोलताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आनंद अश्रुंचा बांध फुटला होता. तर दुसरीकडे आपल्या पतीच्या आठवणीचे दुःखही त्यांना लपवता येत नव्हते.
पती दत्तात्रय देशमुख यांचे 1994 मध्ये निधन झाले. वडिलांचा सहवास न लाभलेल्या संध्याराणी यांच्यासह त्यांची मोठी बहीण विद्या अशा दोन मुलींची जबाबदारी त्यांच्या आई निर्मला यांच्या खांद्यावर पडली. अडचणींशी संघर्ष अन् प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निर्मला यांनी 2000 मध्ये गावातील अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम सुरू केले. तेव्हा त्यांना 500 रूपये मानधन मिळायचे. आपल्या दोन मुलीसाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले.मोठी मुलगी विद्या हीचे लग्न झाले आहे. तिचेही शिक्षण बी.एस्सी झाले आहे. आपल्या दोन्ही मुली शिकल्या पाहीजे असे त्यांना वाटे. या भूमिकेतून त्यांनी संध्याराणीला प्रोत्साहन दिले. 
संध्याराणी देशमुख हीने क्लास न लावता स्वःअध्ययन करुन पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत सर्वसाधारण जागेवर मुलीमध्ये राज्यात 25 व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाली आहे. संध्याराणी यांनी पदवीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. 2016 मध्ये पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत अवघे तीन गुण कमी पडल्याने पद मिळाले नव्हते. अखेर पुन्हा जिद्दीने केलेल्या प्रयत्नांना यश येवून 2018 च्या परीक्षेत 340 पैकी 225 गुण मिळवून राज्यात महिलांमध्ये 25 वा क्रमांक घेत त्यांनी बाजी मारली. देशमुख यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण वांगी क्र.2 येथील जिल्हा परिषद शाळेत, आठवी ते दहावी माध्यमिक शिक्षण गावातीलच अवधूत विद्यालयात, अकरावी व बारावी शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये तर अर्थशास्त्र विषयासह पदवीचे शिक्षण पुणे येथील गरवारे महाविद्यालयात झाले आहे.

आईच्या कष्टाची जाणीव
लहानपणापासून मी आईचे कष्ट पाहिले आहे. आम्हाला घरची अडीच एकर शेती आहे. मी बारावीपर्यंत आईला शेतीत काम करताना मदत करायची. मी शिकावं, मला नोकरी लागावी अशी आईची खुप इच्छा होती. पोलिस खात्याबद्दल लहानपणापासून आकर्षण होते. आईच्या कष्टांची सतत जाणीव ठेवत रात्रंदिवस मी अभ्यास करत राहिले. स्पर्धा परीक्षेतील काहीही माहिती नसताना आईने तू जे करतेय, त्यात यश मिळवशील, फक्त प्रयत्न सोडू नको, वडील एम. कॉम. शिकलेले होते, तू सुद्धा खूप शिक, असे प्रोत्साहन दिले. माझी बहीण विद्या ही सतत मला प्रोत्साहन देत राहिली. त्यातूनच आज हे यश मिळाले आहे. यापुढे मी राज्यसेवेची तयारी करत असून राज्यसेवेची परीक्षा देणार आहे.खरचं विद्यार्थांनी कोणत्याही न्यूनगंड न बाळगता मोठे ध्येय ठेऊन अभ्यास केला पाहीजे.
- संध्याराणी देशमुख, नुतन पोलिस उपनिरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of Deputy Superintendent of Police Sandhyarani