esakal | गारमेंट उद्योजकांमध्ये भिती! पाच वर्षात मिळवलेले दोन महिन्यात पाण्यात गेल्याचे चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

garment industry

‘सोलापूर युनिफॉर्म हब’च्या दिशेने जाणारा येथील गारमेंट उद्योग लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून बंद आहे. देशभरातील लॉकडाउनचा परिणाम या व्यवसायावर इतका झाला, गेल्या चार-पाच वर्षांपासून मिळवलेले या दोन महिन्यांत पाण्यात गेल्याचे चित्र आहे. ज्या ऑर्डरी हाती आहेत, त्या येत्या 30 ते 40 दिवसांत पूर्ण झाल्या नाहीत, तर 2020 वर्ष पूर्णत: नुकसानकारक ठरण्याची भीती गारमेंट उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे.

गारमेंट उद्योजकांमध्ये भिती! पाच वर्षात मिळवलेले दोन महिन्यात पाण्यात गेल्याचे चित्र

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ‘सोलापूर युनिफॉर्म हब’च्या दिशेने जाणारा येथील गारमेंट उद्योग लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून बंद आहे. देशभरातील लॉकडाउनचा परिणाम या व्यवसायावर इतका झाला, गेल्या चार-पाच वर्षांपासून मिळवलेले या दोन महिन्यांत पाण्यात गेल्याचे चित्र आहे. ज्या ऑर्डरी हाती आहेत, त्या येत्या 30 ते 40 दिवसांत पूर्ण झाल्या नाहीत, तर 2020 वर्ष पूर्णत: नुकसानकारक ठरण्याची भीती गारमेंट उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे.
गेल्या चार वर्षांपासून येथील गारमेंट उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून सोलापूरचे नाव युनिफॉर्म मेकिंगमध्ये नोंदवले आहे. त्यामुळे देशभरातील विविध राज्यांतील शाळा- महाविद्यालयांसाठी युनिफॉर्मच्या ऑर्डरी नोंदवल्या जातात. यामुळे नवनवीन गारमेंट उद्योजक तयार झाले. मफतलालसारख्या ब्रँडेड कंपनीने सोलापुरात फॅक्टरी सुरू केली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या युनिफॉर्म प्रदर्शनात अनेक नवीन ग्राहक जोडले गेले तसेच 30 ते 35 नवीन उद्योजक सोलापुरात फॅक्टरी सुरू करण्यास तयार होते. एकूणच खूप सकारात्मक परिणाम येथील गारमेंट उद्योगावर झाला आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मिळालेल्या ऑर्डरीनुसार फेब्रुवारी महिन्यापासून युनिफॉर्मची निर्मिती सुरू झाली होती. 30 जूनपर्यंत खासगी शाळा व 15 ऑगस्ट सरकारी शाळांना युनिफॉर्म तयार करून देण्याची डेडलाइन ठरलेली असते. मात्र कोरोना विषाणूमुळे सुरू झालेल्या लॉकडाउमुळे शाळा- महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता जरी असली तरी वेळेवर युनिफॉर्म न मिळाल्यास तयार युनिफॉर्म नाकारले जाण्याची तसेच लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पैसा नसल्यामुळे या वर्षी नवीन युनिफॉर्म घेणे रद्द होण्यामुळे गारमेंट उद्योग भुईसपाट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाचे सहसचिव प्रकाश पवार म्हणाले, चार-पाच वर्षांपासून सोलापूर युनिफॉर्म हब करण्याचे ध्येय ठेवून येथील गारमेंट उद्योजक कष्ट घेत आहेत. मात्र या वर्षी केवळ दोन-सव्वादोन महिने उत्पादन बंद राहिल्याने 50 टक्के ऑर्डरी रद्द झाल्याचे दु:ख वाटते. आता जर उत्पादने सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही तर, तर उद्योजकांना उद्योग बंद करावे लागतील. कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल. गारमेंट उद्योग पुन्हा उभारणे कठीण होईल.

ठळक

  • * युनिफॉर्मच्या 50 टक्के ऑर्डरी झाल्या रद्द
  • * उद्योग सुरू झाल्यास व कामगार कामावर आल्यास उर्वरित ऑर्डर 30 दिवसांत पूर्ण होऊ शकेल
  • * जर उत्पादने सुरू करण्याची परवानगी मिळाली नाही, तर वर्ष पूर्ण वाया जाणार
  • * ग्रीन झोन असलेल्या कर्नाटकात युनिफॉर्मची उत्पादने जातात. जर या वर्षी उत्पादने सुरू होत नसतील तर ग्राहकांना बंगळूर, बल्लारी पर्याय ठरू शकतात
  • * या वर्षी नेहमीचा ग्राहक दुसऱ्याकडे गेल्यास पुढील वर्षी पुन्हा येण्याची शक्यता कमीच
  • * 500 मोठे व अनेक छोट्या उद्योजकांवर संक्रांत
  • * केरळ, कर्नाटकहून अजूनही मागणी होत आहे, मात्र उत्पादनेच बंद आहेत
  • * रेड झोनमध्ये शाळा सुरू न करता ई-लर्निंग सुरूचे संकेत मिळत आहेत