शिल्पकामे असतील तर ती मला द्या ओ..! परिस्थितीमुळे दिव्यांग शिल्पकाराची कला अडगळीत 

राजशेखर चौधरी 
Tuesday, 15 September 2020

दिव्यांग शिल्पकार परमेश्‍वर सोनकांबळे म्हणाले, माझी स्वतःची जागा नाही व आर्थिक अडचणीने मी माझी कला पुढे नेऊ शकत नाही. नगरपरिषदेने मला एक जागा उपलब्ध करून द्यावी व शहराचे सुशोभीकरण व शिल्पकामे असतील तर ती मला द्यावीत. येत्या काळात आणखी शिक्षण घेणे व कलेच्या वृद्धीसाठी मला मदत व्हावी. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील आझाद गल्ली येथे राहणारे दिव्यांग परमेश्वर सोनकांबळे. दिव्यांग असूनही शिक्षणाची, जगण्याची जिद्द न सोडता एम. ए. फाईन आर्टस्‌चे शिक्षण पूर्ण केले. मात्र आर्थिक अडचणीमुळे आपली हुकूमत असलेली शिल्पकला त्यांना जगासमोर मांडता येत नाही. सध्याच्या कोरोना काळात तरी कुठल्या प्रदर्शनात भाग घ्यावा तर वस्तू निर्मितीस पैसे नाहीत. फी भरण्यासाठी अडचण तसेच स्वतःची जागादेखील नाही. अशा अनंत अडचणींचा सामना ते करीत आहेत. पुढे एम फिल व त्यानंतर पीएचडीचे शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची धडपड मात्र वाखाणण्याजोगी आहे. 

परमेश्वर यांच्या घरात सात भावंडे आहेत. आई-वडील अशिक्षित आहेत. त्यामुळे या सर्व भावंडांचे शिक्षण नीट होऊ शकले नाही. परमेश्‍वर यांना वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओची बाधा होऊन अपंगत्व आले, तरीही शिक्षणाची ओढ मात्र कमी झाली नाही. बारावीनंतर सोलापूर येथे कला व्यवसाय केंद्रात पायाभूत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌ येथे बॅचलर ऑफ फाईन आर्टस्‌ तर दिल्ली येथे ललित कला महाविद्यालय येथे मास्टर ऑफ फाईन आर्टस्‌ याचे उत्तम शिक्षण पूर्ण केले. मुंबईत असताना त्यांना राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जेवण व राहण्यासाठी मोठी मदत केली. त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करणे सोपे गेले. 

सुरवातीला दोन वर्षे त्यांनी दिल्लीत शिक्षकाची भूमिका पार पाडली. त्यानंतर त्यांनी माती, दगडाचे सर्व प्रकार, मेटल व फायबरचे विविध शिल्प बनविणे सुरू ठेवले. त्यातून बॉम्बे आर्टस्‌ सोसायटी, ललित कला ऍकॅडमी, तसेच चेन्नई येथे विविध शिल्प बनवून प्रदर्शनात मांडले आणि त्यांना पुरस्कार देखील मिळाले. सध्या त्यांच्याकडे कोणतेही काम नाही आणि स्वतःची जागा नसल्याने आर्थिक अडचणीत ते त्यांची शिल्पकला पुढे नेऊ शकले नाहीत. या महिन्यात सप्टेंबर 15 ते 21 या काळात जहॉंगीर आर्ट गॅलरी येथे होणाऱ्या प्रदर्शनात वस्तू तयार करण्यासाठी पुरेशी रक्कम आणि भाग घेण्यासाठी देय असलेली वर्गणी देखील भरता न आल्याने त्यात ते भाग घेऊ शकले नाहीत, याची खंत त्यांना सतावते आहे. 

No photo description available.

शिल्पकार परमेश्‍वर सोनकांबळे म्हणाले, माझी स्वतःची जागा नाही व आर्थिक अडचणीने मी माझी कला पुढे नेऊ शकत नाही. नगरपरिषदेने मला एक जागा उपलब्ध करून द्यावी व शहराचे सुशोभीकरण व शिल्पकामे असतील तर ती मला द्यावीत. येत्या काळात आणखी शिक्षण घेणे व कलेच्या वृद्धीसाठी मला मदत व्हावी. 

No photo description available.

त्यांचे मित्र जोतिबा पारखे म्हणाले, परमेश्वर हा माझा बालपणापासून मित्र आहे. केवळ आर्थिक अडचणीमुळे ते आपली कला पुढे नेऊ शकत नाही. त्यांना समाजातील धुरिणांनी आर्थिक मदत करावी. त्याला माझ्या परीने मी मदत केली आहे. अक्कलकोटच्या पुण्यनगरीतील दानशूर बंधूंनी त्याची कला पारखून मदतीचा हात पुढे करावा. 

अक्कलकोटचे शिक्षक धानय्या कवटगीमठ म्हणाले, परमेश्वर याचे दुःख पाहून मी शिक्षणासाठी नेट-सेट पुस्तके मोफत देऊन आर्थिक मदत देखील केली आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी यांना आर्थिक मदत करून सहकार्य करावे आणि त्यांच्यात दडलेली उत्कृष्ट कला बहरावी यासाठी प्रयत्न व्हावेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The struggle for survival of the disabled sculptor continues