मंगळवेढ्यात पोलिस अधीक्षक पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 2.85 लाखांचा मुद्देमाल जप्त, 17 जणांविरुद्ध गुन्हा 

हुकूम मुलाणी 
Tuesday, 8 September 2020

मंगळवेढा शहरामध्ये दहापेक्षा अधिक जुगाराचे अड्डे सुरू असून यातून पोलिस खात्याला आर्थिक रक्कम मिळत असल्याची चर्चा कारवाईनंतर पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना एकत्र जमून जुगार खेळण्याचा सुगावा स्थानिक पोलिसांना न लागता जिल्हा पथकाला लागतो, याबाबत नागरिकांच्या उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. 

मंगळवेढा (सोलापूर) : शहरातील रविकिरण बिअर बारच्या पाठीमागे खुल्या जागेत पैसे लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या 17 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून तब्बल दोन लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक ग्रामीणच्या विशेष पथकाने केली असली तरी कारवाईतील बिअर बार मात्र मंगळवेढ्यात नसल्याने कारवाईबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

हेही वाचा : शाळेत जाताना पायात चप्पल नाही, गणितात नापास व इंग्रजी समजत नाही म्हणून सायन्स सोडले अन्‌ आज तो आहे... 

या घटनेची हकिकत अशी, की पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून रविकिरण बिअर बारच्या पाठीमागील खुल्या जागेत काही जुगारी पैज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. यावरून तेथे छापा टाकला असता यातील आरोपी विक्रम श्‍यामराव शेंबडे (वय 34), संजय सुरेश मोरे (वय 42), संदेश सिद्धेश्‍वर काळुंगे (वय 29), अमोल कृष्णा मुदगूल (वय 29), योगेश यल्लाप्पा कट्टे (वय 49), संदीप हरी पडवळे (वय 34), विजय जयवंत कट्टे-पाटील (वय 53), ज्ञानेश्‍वर श्‍यामराव इंगळे (वय 35), बालाजी अशोक इंगळे (वय 30), सचिन भाऊ चेळेकर (वय 34), नागराज आडव्याप्पा होनमोरे (वय 40), सागर शिवाजी डांगे (वय 21), निखिल बाळासाहेब कोळी (वय 24), अनिल सिद्धेश्‍वर डांगे (वय 40), गणेश शिवाजी निचळ (वय 25), बाळू भीमाशंकर बुधवंतराव (वय 55, सर्वजण रा. मंगळवेढा), मधुकर ज्ञानदेव शिंदे (वय 36, रा. डोंगरगाव) आदी गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळताना पथकाला मिळून आले. या वेळी पोलिसांनी रोख रक्कम, पाच मोटारसायकली असा एकूण दोन लाख 85 हजार 490 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. 

हेही वाचा : ब्रेकिंग ! विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची सक्ती 

शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. अशा परिस्थितीत जुगार व इतर अवैध धंदे सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत. पाठकळमध्ये केलेल्या कारवाईत जप्त केलेली रक्कम व कारवाईत दाखवलेली रक्कम यात तफावत झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे किती गांभीर्याने घेतात, याकडे लक्ष लागले आहे. शहरामध्ये दहापेक्षा अधिक जुगाराचे अड्डे सुरू असून यातून पोलिस खात्याला आर्थिक रक्कम मिळत असल्याची चर्चा कारवाईनंतर पोलिस ठाण्याच्या आवारात सुरू झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना एकत्र जमून जुगार खेळण्याचा सुगावा स्थानिक पोलिसांना न लागता जिल्हा पथकाला लागतो, याबाबत नागरिकांच्या उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. सध्या शासनाने नागरिकांनी कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी व्यक्तिगत पातळीवर सोपवल्याने व संचारबंदी नसल्याने पोलिसांची कुमक या कामातून मुक्त झाली आहे. अवैध वाळू उपसा, मटका, जुगार यांसारख्या काही धंद्यांमुळे तालुक्‍याबरोबरच पोलिस खात्याला बदनामीचा डाग लागला. जिल्हा पोलिस प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Superintendent of Police raided the gambling den and took action in Mangalwedha city