घेरडीच्या 10 हजार नागरिकांचे सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

अफवांवर विश्‍वास ठेवू नये 
नागरिकांनी कोणतीही अफवा पसरवू नये व अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये. गावात अन्या गावातून आलेल्यांची माहिती त्वरित प्रशासनास देऊन सहकार्य करावे. सध्या घेरडी परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू असून यात तीन जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवत असून त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून उपचार करण्यात येत आहेत. 
- उदयसिंह भोसले, प्रांताधिकारी, मंगळवेढा 

सांगोला (जि. सोलापूर) : घेरडी (ता. सांगोला) परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले असून संपूर्ण गावाचे 62 कर्मचाऱ्यांमार्फत 10 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. 
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधित पहिलाच रुग्ण सांगोला तालुक्‍यातील घेरडी येथे आढळला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आज याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. घेरडी परिसरात तीन किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. गावातील 15 वाड्यावस्त्यांत एक हजार 550 कुटुंबांतील 10 हजार 929 नागरिकांचे प्रशासनामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा आणि अंगणवाडी सेविकांद्वारे माहिती संकलित करण्यात येत आहे. 31 पथकातील 62 कर्मचाऱ्यांद्वारे संपूर्ण गावचे सर्वेक्षण करण्यात आले. या कर्मचाऱ्यांवर सहा पर्यवेक्षक देखभालीस ठेवले आहेत. गावात बारामती पॅटर्न राबवून प्रत्येक कुटुंबाला घरपोच किराणा, दूध, फळे, भाज्या देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी तालुक्‍यातील सर्व प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी श्री. भोसले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of 10 thousand citizens of Gherdi