थर्मल स्कॅनरद्वारे विडी घरकुल परिसरात सर्वेक्षण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जुने विडी घरकुल येथील प्रभाग 10 व 11 येथे सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. या कालावधीत कोरोना व सारी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. तसेच कोरोना वॉरिअर्सची 10 पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत परिसरातील सर्व नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जुने विडी घरकुल येथील प्रभाग 10 व 11 येथे सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. या कालावधीत कोरोना व सारी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली. तसेच कोरोना वॉरिअर्सची 10 पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत परिसरातील सर्व नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

हेही वाचा ः कोरोनाच्या आडून भाजपचे राजकारण
जुने विडी घरकुल परिसरात सारी व कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या मार्गदर्शनात मंगळवारी दुपारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना वॉरिअर्सची 10 पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येक पथकाकडे एक ऑक्‍सिमीटर व एक थर्मल स्कॅनर देण्यात आले आहे. एका पथकाकडून दररोज 100 घरांचा सर्व्हे करण्यात येत आहे. विडी घरकुल येथील सर्व ग्रुपसह चाकोतेनगर, विजय ब्रह्मनाथनगर, क्षीरालिंगनगर, योगेश्‍वरनगर, कोटानगर आदी नगरांतील सर्व नागरिकांचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्‍सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येत असून, त्यांची नोंद ठेवली जात आहे. साधारण एका दिवसात पाच हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एखाद्या नागरिकास ताप व अन्य लक्षणे आढळल्यास त्याला आरोग्य तपासणीसाठी पाठविले जात आहे. नगरसेवक प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा यांच्या मार्गदर्शनात हे सर्वेक्षण केले जात आहे. 

हेही वाचा ः पालकमंत्री भरणे यांची विशेष मुलाखत
घरकुल परिसर हा कामगारबहुल असल्याने लॉकडाउन काळात विडी, यंत्रमाग व गारमेंट कामगारांना रेशन दुकानातून धान्य वाटप झाले की नाही, याचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच परिवहन विभागाकडून फिरत्या दवाखान्याची मागणी केली असून, त्याचाही पाठपुरावा सुरू आहे. या परिसरातील काही नागरिक सिंहगड कॉलेजमध्ये दाखल आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी, नगरसेवक पाठपुरावा करत आहेत. महाराष्ट्र

कोरोना व सारीचे रुग्ण वाढू नयेत, त्यांची साखळी तोडली जावी यासाठी लागू करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कालावधीत जंतुनाशक फवारणी करण्यात येत असून, थर्मल स्कॅनर व ऑक्‍सिमीटरद्वारे नागरिकांची तपासणी करून नोंद घेतली जात आहे. यामुळे घरकुल येथील परिस्थिती आटोक्‍यात येण्यासाठी उपाय योजण्यास मदत होणार आहे. 
- प्रथमेश कोठे, नगरसेवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Survey of Gharkul area by thermal scanner