सांगोला तालुक्‍यात बाहेरून आलेल्यांचा सर्व्हे सुरू 

corona 1.jpg
corona 1.jpg

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍याच्या शेजारी असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात परदेश, परराज्य तसेच पुणे, मुंबई व इतर शहरांतून नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन आले आहेत. अशा नागरिकांचा तसेच सर्वच कुटुंबांचा आरोग्य विभागामार्फत सर्व्हे करण्याचे नियोजन सांगोला पंचायत समितीने केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिली. 
सांगोला तालुक्‍यात 57 हजार 825 ग्रामीण कुटुंबसंख्या व दोन लाख 88 हजार 525 ग्रामीण लोकसंख्या आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील विविध गावांत नागरिक बाहेरून आले आहेत. अशा नागरिकांचा सर्व्हे आरोग्य विभागामार्फत यापूर्वीच करण्यात आला असून जवळपास 17 हजार नागरिक तालुक्‍यातील विविध गावांत आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, यापैकी कोणालाही कोरोना रोगाची लक्षणे अद्याप दिसून आली नाहीत, ही समाधानाची बाब आहे. तथापि या सर्व्हेमध्ये गावातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची नोंद घेणार आहेत. त्यापैकी एखादी व्यक्ती बाहेरगावातून आली असेल तर ती किती दिवसांपूर्वी गावात आली आहे, याचीही नोंद घेण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप यापैकी काही लक्षणे दिसतात का, याचीही नोंद घेण्यात येणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व्हेची माहिती रोजच्या रोज ऑनलाइन भरली जाणार आहे. ही माहिती ऑनलाइन भरण्याचे काम ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्रचालक करणार आहेत. गावपातळीवर या सर्व्हेच्या सनियंत्रणाची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे. तसेच तालुका स्तरावरून या सर्व्हेबाबत मार्गदर्शन करणे, ग्रामपंचायतीकडून अहवाल जमा करणे, याबाबतची जबाबदारी नऊ विस्तार अधिकारी व पाच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर देण्यात आली आहे, असे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले. पंचायत समिती सांगोला येथे तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमनी, सहायक गटविकास अधिकारी विकास काळुखे व बालविकास प्रकल्प अधिकारी असमा आतार हे संयुक्तपणे या सर्वेक्षणाचे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

पदाधिकाऱ्यांनी सर्व्हेबाबत पुढाकार घ्यावा
गावातील पदाधिकाऱ्यांनी सर्व्हेबाबत पुढाकार घ्यावा, कोणतीही व्यक्ती माहिती लपवणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी तसेच नागरिकांनीसुद्धा माहिती देण्याबाबत सहकार्य करावे. कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर प्रशासनास सहकार्य करा. काही लक्षणे दिसत असल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करा. 
- संतोष राऊत, गटविकास अधिकारी, सांगोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com