धार्मिक स्थळे उघडल्याने भाविकांत समाधान ! अक्कलकोटमध्ये आज दिवसभर भाविकांची रेलचेल 

राजशेखर चौधरी 
Monday, 16 November 2020

महाराष्ट्र शासनाच्या आज दिवाळी पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या निर्णयानुसार अक्कलकोट तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आज भाविकांत एक वेगळ्या प्रकारचे समाधान दिसत होते. 

अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र शासनाच्या आज दिवाळी पाडव्यापासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याच्या निर्णयानुसार अक्कलकोट तालुक्‍यातील शहर व ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आज भाविकांत एक वेगळ्या प्रकारचे समाधान दिसत होते. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, शिवपुरी, राजेराय मठ, गुरू मंदिर, शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह, श्री काशीविशेश्वर मंदिर - जेऊर, ख्वाजा सैफुल मुलूक दर्गाह, जागृत मारुती मंदिर - गौडगाव, श्री परमेश्वर देवस्थान - वागदरी यासह तालुक्‍यातील सर्व श्रद्धास्थाने आज उघडण्यात आली आहेत. 

आज सोमवारी पहाटे भाविकांच्या उपस्थितीत पहाटेची काकड आरती करण्यात येऊन भाविकांसाठी श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदित दर्शनास खुले झाले. आज दिवाळी पाडवा सणाचे औचित्य साधत स्थानिक व बाहेरगावावरून दर्शनास भाविक मोठ्या संख्येने अक्कलकोट शहरात दाखल होताना दिसले. दरम्यान, आज श्री स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मंदिर भाविकांसाठी खुले करावे, यासाठी एकदा घंटानाद तर दुसऱ्यांदा भजन आंदोलन केले होते. त्यामुळे आज त्यांनी पहाटे काकड आरतीसाठी उपस्थिती दर्शवून दर्शन घेतले. 

त्याचप्रमाणे मागील आठ महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरच दर्शनास बंद असल्याने कमी झालेली भाविकांची वर्दळ आज वाढल्याने आज मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला. मंदिराजवळील पूजा-अर्चा, प्रसाद साहित्य भांडार व हॉटेल्स उघडली गेली आहेत. त्यामुळे तिथेही भाविकांची पहिल्या दिवशी लक्षणीय उपस्थिती दिसून आली. त्या दुकानदारांचा संपूर्ण व्यवहार आठ महिन्यांपासून बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, जागेचे भाडे, बॅंकेचे व्याज आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. आता त्यातून त्यांना मार्ग काढावे लागणार आहे. 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ सेवा कार्यान्वित 
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद सेवा देणारे अन्नछत्र मंडळ हे संस्थापक जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, सचिव श्‍यामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या संयोजनातून कोरोना प्रादुर्भावात स्थगित ठेवण्यात आलेली महाप्रसाद सेवा आज पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण, मास्क सक्ती, दहा- बारा ठिकाणी सॅनिटायझर, भाविकांत योग्य अंतर आदी नियम पाळण्यात येत आहेत. या ठिकाणी आज पहिल्या दिवशी गोड महाप्रसाद देऊन ही सेवा पुन्हा आरंभ करण्यात आली. 

आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, सरकारला असंख्य आर्जवे करावी लागली तेव्हा कुठे स्वामींच्या दर्शनाचे दार उघडले! स्वामी मनामनात आहेत, स्वामी चराचरात आहेत, पण सरकारने आजपर्यंत सर्वसामान्य भक्तांच्या भक्तीची परीक्षा बघितली! आज पहाटे स्वामी समर्थांच्या मंदिरात सपत्नीक, समर्थांच्या काकड आरतीचा साक्षीदार झालो. बळिराजा सुखी होऊ दे, सर्वांना सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे आणि महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर होऊ दे, हीच स्वामीचरणी प्रार्थना! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! 

प्रसाद भांडार दुकानदार मुबारक कोरबू म्हणाले, धार्मिक स्थळे ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. ती उघडल्याने आनंद झाला आहे. त्यामुळे आम्हा दुकानदारांनाही दिलासा मिळणार आहे. इतके दिवस कोरोनाने धास्तीत असलेले भाविक त्याचे नियम पाळत दर्शन घेत गेल्यास कोणतीही समस्या उद्‌भवणार नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swami Samarth temple was opened for darshan in Akkalkot