लऊळ येथे मरिआई लक्ष्मी मंदिरातील मूर्तीसह दागिन्यांची चोरी; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल 

वसंत कांबळे 
Saturday, 19 September 2020

मरिआई लक्ष्मी मंदिराच्या लोखंडी व लाकडी दोन दरवाजांचा कुलूप-कोयंडा तोडून मंदिरातील चांदीची मूर्ती व सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना शनिवारी (ता. 19) पहाटेच्या सुमारास लऊळ (ता. माढा) येथील डिकोळे गल्लीत घडली आहे. 

कुर्डू (सोलापूर) : मरिआई लक्ष्मी मंदिराच्या लोखंडी व लाकडी दोन दरवाजांचा कुलूप-कोयंडा तोडून मंदिरातील चांदीची मूर्ती व सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना शनिवारी (ता. 19) पहाटेच्या सुमारास लऊळ (ता. माढा) येथील डिकोळे गल्लीत घडली आहे. या घटनेची फिर्याद पुजारी राजाभाऊ डिकोळे यांनी पोलिस ठाण्यात दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचा कोयंडा कापून चांदीची मूर्ती व सोन्याचे दागिने दुरडीसह चोरून नेली. रोख रकमेसह एकूण एक लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. घटनास्थळाची पोलिस पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. 

सध्या दिवसा ढगाळ वातावरण व रात्री रिमझिम पडत असलेल्या पावसाचा फायदा घेऊन चोरट्याने शनिवारी (ता. 19) पहाटे एक ते तीनच्या दरम्यान डिकोळे गल्लीतील मरिआई लक्ष्मी मंदिरातून अंदाजे दोन किलो चांदीची देवीची मूर्ती व सात तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पसार झाला. पहाटे नित्य पूजेसाठी पुजारी राजाभाऊ डिकोळे आले असता त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा व मूर्ती नसल्याचे लक्षात आले. हा प्रकार समाजातील सर्वांना सांगून त्यांनी पोलिस ठाणे गाठले. 

कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, बिट हवालदार धनाजी माळी व सोमवाड, माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आपले दैवत चोरीस गेल्याने येथील वडार समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्वरित तपास करण्याची मागणी समाजामधून होत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of jewelery including idol from Mariai Lakshmi temple at Laul