esakal | मृतदेहांचे ढीग पाहून स्मशानभूमीही गहिरवली ! तीन दिवसांत 65 जणांचा अंत्यविधी; स्मशानभूमीही पडतेय कमी

बोलून बातमी शोधा

cremation

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहरात दररोज सरासरी दहा तर ग्रामीणमध्ये सात ते आठ रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात चार स्मशानभूमी असून, त्यात एक विद्युत दाहिनी आहे. अक्षरश: स्मशानभूमीत मृतांचे ढीग पडले असून, एका मृताच्या अंत्यविधीसाठी किमान दीड तास लागत आहे. 

मृतदेहांचे ढीग पाहून स्मशानभूमीही गहिरवली ! तीन दिवसांत 65 जणांचा अंत्यविधी; स्मशानभूमीही पडतेय कमी
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहरात दररोज सरासरी दहा तर ग्रामीणमध्ये सात ते आठ रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शहरात चार स्मशानभूमी असून, त्यात एक विद्युत दाहिनी आहे. अक्षरश: स्मशानभूमीत मृतदेहांचे ढीग पडले असून, एका मृताच्या अंत्यविधीसाठी किमान दीड तास लागत आहे. शुक्रवारी 23 तर शनिवारी 25 रुग्णांचा अंत्यविधी झाल्याची माहिती उपायुक्‍त धनराज पांडे यांनी दिली. तर रविवारी 17 रुग्णांचा अंत्यविधी पार पडला. हे विदारक चित्र पाहून स्मशानभूमीदेखील गहिवरली, अशी अवस्था शहरात पाहायला मिळत आहे. 

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी किमान 20 लोकांची उपस्थिती असावी, असे निर्बंध घालून दिले आहेत. मृतांवर अंत्यविधी करण्यापूर्वी त्यांच्या नातेवाइकांना लांबूनच शेवटचे मुखदर्शन करून दिले जात आहे. शहर असो वा ग्रामीण भागातील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास तो मृतदेह घेऊन जाऊ दिला जात नाही. त्यामुळे त्यांना शहरातील स्मशानभूमीत मृतावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 

दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने अंत्यविधीसाठी विलंब लागत आहे. आठ ते दहा तासांनंतर विद्युत दाहिनी काही वेळासाठी बंद करावी लागते. कोरोना काळातील मृतांचे ढीग पाहून स्मशानभूमीदेखील गहिवरली असेल, अशी स्थिती आहे. काहींवर लाकडांचा वापर करून तर काहींवर त्यांच्या धार्मिक पंरपरांनुसार अंत्यंसस्कार केले जात आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी दिली. 

अंत्यविधीसाठी कमी पडू लागली स्मशानभूमी 
सोलापूर शहरातील शांती चौक स्मशानभूमी, हिंदू स्मशानभूमी, मोदी स्मशानभूमी, रूपाभवानी मंदिर परिसरातील स्मशानभूमी आणि कारंबा रोडवरील स्मशानभूमीत अंत्यविधीची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी मोदी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी दोन विद्युत दाहिन्या असून त्यातील एक विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंदच आहे. प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना विद्युत दाहिनीद्वारे अंत्यविधी करण्याचे आवाहन केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यासाठीही मोठी गर्दी होऊ लागली आहे. एका मृतदेहावरील अंत्यसंस्कार अंतिम टप्प्यात आल्यानंतर दुसरा मृतदेह त्या ठिकाणी आणला जात आहे, अशी भयावह परिस्थिती सध्या स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर शांती चौक स्मशानभूमीत आता गॅस दाहिनी उभारली जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल