ब्रेकिंग! सोलापुरात कोणताही लॉकडाउन नाही; इंदापुरात 12 ते 23 सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू 

तात्या लांडगे 
Friday, 11 September 2020

पालकमंत्री भरणे म्हणाले... 

  • सोलापुरात यापुढे कोणताही लॉकडाउन केला जाणार नाही 
  • "माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकाने घ्यावी स्वतःच्या घरातील सदस्यांची काळजी 
  • सोलापूरकरांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि स्वच्छता या नियमांचे करावे तंतोतंत पालन 
  • 50 ते 55 वर्षांवरील को-मॉर्बिड लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांच्या आरोग्याची घ्यावी खबरदारी 
  • सोलापुरात नव्हे तर इंदापुरात 12 ते 20 सप्टेंबरदरम्यान पाळला जाईल जनता कर्फ्यू 

सोलापूर : राज्य सरकारमार्फत "मिशन बिगीन अगेन' ते "पुन:श्‍च हरिओम' या मोहिमेअंतर्गत लॉकडाउन अनलॉक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वत:बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. सोलापुरात नव्हे तर इंदापुरात 12 ते 20 सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी "सकाळ'च्या माध्यमातून केले आहे. 

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात 24 मार्चनंतर तब्बल 72 दिवसांचा कडक लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतरही सोलापूरकरांच्या मागणीनुसार दहा दिवसांचा लॉकडाउन करण्याचा निर्णय झाला. आता जनजीवन सुरळीत झाले असून पुन्हा लॉकडाउन करण्याचा अजिबात विचार नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची लस अद्यापही आलेली नसल्यामुळे संसर्ग कमी करण्याची जबाबदारी सरकारच्या बरोबरीने जनतेनेही घ्यायला हवी; जेणेकरून हा विषाणू लवकरच हद्दपार होईल, असा विश्वासही पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केला. 

"माझे कुटुंब माझी जबाबदारी'ची व्हावी प्रभावी अंमलबजावणी 
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता दहा लाखांवर पोचली असून, मृतांची संख्याही 28 हजारांहून अधिक झाली आहे. 50 ते 60 वर्षांवरील पूर्वीचे गंभीर आजार असलेले लोक कोरोनाचे बळी ठरू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "माझे कुटुंब माझी जबाबदारी'ची नवीन योजना राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत 50 वर्षांवरील सर्वच व्यक्तींचा फेरसर्व्हे करून त्यांची नियमित तपासणी व चौकशी केली जाणार आहे व त्यांच्यावर देखरेख ठेवून वेळेत निदान करावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशाही सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी "सकाळ'च्या माध्यमातून प्रशासनाला केल्या. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no lockdown in Solapur but public curfew will be imposed in Indapur