सोलापूरकरांनो, जपून वापरा पाणी ! "औज'मध्ये शिल्लक आहे 20 दिवसांचाच पाणीसाठा 

तात्या लांडगे 
Thursday, 7 January 2021

यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने उजनी धरण, औज बंधारा, हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, औज बंधाऱ्यातील पाणी दररोज सरासरी पाच सेंटिमीटरने कमी होऊ लागले आहे. औज बंधाऱ्यातून प्रामुख्याने शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, आता या बंधाऱ्यात 20 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. 

सोलापूर : शहराला उजनी, औज व हिप्परगा तलाव या तीन स्रोतांतून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील प्रत्येक नागरिकास दररोज 135 लिटर पाणी देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात 90 लिटरपर्यंतच पाणी मिळते, असे वास्तव असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. औज बंधाऱ्यातील पाणी आता 25 जानेवारीपर्यंतच पुरणार असल्याने उजनीतून पाणी सोडावे, असे पत्र पाटबंधारे विभागाला दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 

यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने उजनी धरण, औज बंधारा, हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, औज बंधाऱ्यातील पाणी दररोज सरासरी पाच सेंटिमीटरने कमी होऊ लागले आहे. औज बंधाऱ्यातून प्रामुख्याने शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र, आता या बंधाऱ्यात 20 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. 

विजेचा लपंडाव आणि जुनाट पाइपलाइनला लागलेल्या गळतीमुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळित होऊ लागला आहे. औज बंधाऱ्याची साठवण क्षमता 0.42 टीएमसी असून औज बंधाऱ्यापर्यंत भीमा नदीद्वारे पाणी येण्यासाठी सहा टीएमसी पाणी सोडावे लागते. शहरातील योजना कालबाह्य झाल्या असून, त्याची कायमची दुरुस्ती करावी, नव्याने पाइपलाइन टाकावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी 300 कोटींहून अधिक रुपयांची गरज आहे. त्याची जुळवाजुळव होत नसल्याने आणखी काही वर्षे नागरिकांना नियमित तथा एक दिवसाआड पाण्यासाठी वाट पाहावी लागेल, अशी शक्‍यताही अधिकाऱ्यांनी वर्तविली. 

रब्बी हंगामासाठी उजनीतून आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. भीमा नदीतून शहरासाठीही पाणी सोडण्याची मागणी कळविण्यात आली आहे. 
- धीरज साळे,
अधीक्षक अभियंता, पाटबंधारे 

सत्ताधाऱ्यांकडून पाण्याचे राजकारण 
शहरातील हद्दवाढ भागात काही ठिकाणी पाइपलाइन नाही तर बहुतांश ठिकाणची पाइपलाइन जुनाट झाली आहे. शहरातील नागरिकांना नियमित तथा एक दिवसाआड पाणी मिळण्यासाठी तब्बल 311 कोटींचा खर्च करावा लागणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे नवा आराखडा तयार केला जात आहे. मात्र, शहरातील विस्कळित पाणी पुरवठ्याची कारणे, अडथळे माहिती असतानाही निवडणुकीपूर्वी सत्ताधारी व विरोधकांनी नागरिकांना नुसतीच आश्‍वासने दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तीन- चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणी कधीपासून मिळणार, याबद्दल कोणीच स्पष्टपणे सांगत नसल्याचे दिसून येत आहे. 

ठळक बाबी... 

  • उजनीतील पाणीसाठा : 104 टक्‍के 
  • शहरासाठी चार रोटेशन : 22 टीएमसी 
  • उजनीतून प्रत्यक्षात मिळणारे पाणी : 3.5 टीएमसी 
  • नदीद्वारे उजनी ते औजमधील अंतर : 200 किलोमीटर 
  • महापालिकेकडील आताची थकबाकी : 4.39 कोटी 
  • थकबाकीचा न्यायालयातील वाद : 105 कोटी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is only enough water left in the dam for twenty days