"सैराट झालं जीऽऽऽ' ! उजनी पाणलोट परिसरात गुलाबी मैना, भोरड्यांच्या विलोभनीय हवाई कसरती 

Birds
Birds

केत्तूर (सोलापूर) : गुलाबी मैना व भोरड्या या नावाने परिचित असलेले, युरोपातून स्थलांतर करून ज्वारी व द्राक्ष पिकांवर डल्ला मारणारे विदेशी पाहुणे पक्षी हजारोंच्या संख्येने उजनी धरणाच्या परिसरात येऊन दाखल झाले आहेत. करमाळा तालुक्‍यातील पारेवाडी व केत्तूर परिसरात हजारोंच्या संख्येने हे पक्षी सध्या मुक्कामाला असून त्यांच्या हवाई कसरतींचे विलोभनीय दृष्य पाहून "सैराट' चित्रपटातील भोरड्या पक्ष्यांच्या थव्यांची आठवण लोकांना येत आहे. 

इंग्रजीमध्ये रोझी पॅस्टर व स्टर्लिंग या नावाने ओळखले जाणारे हे पक्षी युरोपातील हिवाळ्यात जाणवणाऱ्या कडाक्‍याच्या थंडीपासून बचाव करून घेण्यासाठी भारतात येतात. विशेष करून महाराष्ट्रातील ज्वारी पिकविणाऱ्या प्रदेशात बहुसंख्येने येऊन दाखल होतात. सोलापूर जिल्ह्यात यांची वारी वर्षानुवर्षे चालूच आहे. जिल्ह्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपले शेतजमीन ओलिताखाली आणून ज्वारी पिकांकडे दुर्लक्ष करत वर्तमानात बागायती शेतीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीमध्येही या पक्ष्यांनीही आपल्या खाद्य सवयीत बदल करत सध्या ते द्राक्ष, पपई, अंजीर, डाळिंब यांसारख्या फळपिकांवर उपजीविका चालवतात. हे पक्षी अमाप संख्येने उभ्या पिकांवर डल्ला मारत असल्याने ते शेतकऱ्यांना उपद्रवी ठरतात. शेतकरी पिकांवर वेगवेगळी तणनाशके, औषधे वापरत असल्याने ही तणनाशके मात्र या पक्ष्यांसाठी मारक ठरत आहेत. 

पारेवाडी व केत्तूर परिसरातील पाणथळाजवळ असलेल्या झाडांवर हे पक्षी दररोज मुक्कामाला येतात. दिवसभर उदरनिर्वाहासाठी हजारोंचा थवा करून पंचक्रोशीत हे पक्षी विखरून जातात व सायंकाळच्या वेळी मुक्कामासाठी अनेक थवे एकत्र येतात. या पक्ष्यांतील वैशिष्ट्य म्हणजे, झाडावर आसनस्थ होण्यापूर्वी हजारोंच्या संख्येत ठरलेल्या वेळेतच एकत्र येऊन हवाई कसरत करतात. हे पक्षी आपल्यातील समंजस राखून विना अपघात स्वतःवर नियंत्रण ठेवत अतिवेगाने हवाई कसरती करतात. आकाशातील त्यांची ही विलोभनीय दृष्ये सर्वांना थक्क करून सोडतात. 

सकाळी सूर्योदयाबरोबर हे पुन्हा सुमारे वीस मिनिटे हवेत घोंगावत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. बयोअन्सी या शास्त्रीय तत्त्वावर हे पक्षी मोठ्या थव्याने घोंगावत ऊर्जित होतात. सुमारे पंधरा मिनिटांच्या कसरतीनंतर झाडावर विसावून दहा मिनिटे एकच कलकलाट करत आपसात संवाद साधतात. अंधार दाटून आला की एकदम चिडीचूप होऊन झोपी जातात. सकाळच्या प्रहराच्या पूर्वी किलबिल करत सूर्योदयाबरोबर आकाशात उड्डाण घेऊन पुन्हा घोंगावत सर्व दिशेने विखरून जातात. 

सकाळ व संध्याकाळी हे पक्षी आबालवृद्धांचे लक्ष वेधून घेत आहेत. कोर्टीजवळील आळसुंदे येथेही सध्या भोरड्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. करमाळा तालुक्‍यात उसासह फळबागांचे क्षेत्र वाढल्याने हे पक्षी या भागांना जवळ करून केत्तूर, पारेवाडी, हिंगणी येथील पाझर तलाव व उजनी जलाशयाच्या पाणफुगवट्यावरील झाडाझुडपात आश्रय घेत आहेत. ज्वारीची सुगी संपल्यानंतर म्हणजे एप्रिलमध्ये हे पक्षी आपल्या मायदेशी परततात. 

एकेकाळी ज्वारीला प्राधान्य देणारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता सिंचनाचा अवलंब करत नगदी पिकाकडे वळला आहे. जिल्ह्यातील ज्वारीचे पीक घटत चालले असतानासुद्धा भोरड्या पक्षी मात्र आपली पाठ फिरवली नाही. त्यामुळे भोरड्या या परदेशी पक्ष्यांच्या वावराने जिल्ह्यात पक्षी वैभव टिकून राहिले आहे. 
- डॉ. अरविंद कुंभार, 
पक्षी अभ्यासक 

वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे आवर्जून उजनी जलाशयावर मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यावर्षी अत्यल्प आहे. त्यातच उजनी जलाशयाचा पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने पाणथळ व दलदलीच्या जागा अल्प प्रमाणात रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे उजनीचे आकर्षण असणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्याचे आगमनही अद्यापपर्यंत झालेले नाही. परंतु, सध्या देशी पक्ष्यांची मात्र वर्दळ वाढू लागली आहे. 
- कल्याणराव साळुंके, 
पक्षी निरीक्षक, कुंभेज 

संपादन : श्रीनिवास दुध्याल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com