तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील करमाळा यामुळे राहिला कोरोनामुक्त 

प्रमोद बोडके
रविवार, 21 जून 2020

करमाळा​ प्रशासनाचे कौतुकच... 
पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वीणा पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराज घोगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित निमकर यांच्यासह करमाळा तालुक्‍यातील सर्वच प्रशासकीय विभागाने दाखविलेली एकजूट आणि प्रभावी निर्णय प्रक्रिया महत्त्वाची ठरली आहे. तहसीलदार समीर माने यांनी एक दिवसाआड सर्व विभागाची बैठक घेऊन कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? याबाबत सर्वांची मते जाणून घेतली. सर्वांशी विचार विनिमय करून निर्णय प्रक्रिया राबविली. जिल्हा व राज्य पातळीवरील प्रश्‍न सोडविण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला व तालुक्‍यातील प्रशासनाला पाठबळ दिल्याने करमाळा कोरोनामुक्त राहिला आहे. 

सोलापूर : पुणे, नगर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आज सोलापूर जिल्ह्यात चर्चेत आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि मंगळवेढा या फक्त दोनच तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्ण नाहीत. कोरोना विरुद्धच्या लढाईत करमाळा तालुक्‍यातील जनतेने दाखविलेली जागरूकता व एकजूट, प्रशासनाने ठेवलेला योग्य समन्वय यामुळेच करमाळा तालुका कोरोनामुक्त राहिला असल्याची माहिती करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. 

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण 12 एप्रिल रोजी सोलापूर शहरात सापडला. या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे अवघ्या अडीच महिन्यात सोलापूर शहर कोरोनाच्या बाबतीत हाताबाहेर गेले आहे. शनिवारी रात्रीच्या अहवालानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 2 हजार 70 झाली आहे. कोरोनामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील 172 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील इतर तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना करमाळा आणि मंगळवेढा तालुका कोरोनामुक्त कसा राहिला? या तालुक्‍यातील जनतेने आणि प्रशासनाने वेगळे असे काय केले? त्यामुळे ते कोरोनामुक्त राहिले याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे, नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच होते. करमाळा तालुक्‍याचा या दोन्ही जिल्ह्यातील जामखेड, बारामती, कर्जत, राशीन, इंदापूर, दौंड या तालुक्‍यांसोबत सातत्याने संपर्क येतो. तरी देखील हा तालुका कोरोनामुक्त राहिला आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला भक्कम पाठबळ आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले आहे. 
 
इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनवर दिला भर 
बाहेरच्या जिल्ह्यातून करमाळ्यात तालुक्‍यात आलेल्या व्यक्तींना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यावर सर्वाधिक भर देण्यात आला. बाहेरगावाहून आलेल्या जवळपास 4 हजार 26 व्यक्तींना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन केले. 2 हजार 895 व्यक्तींना होम क्वारंटाईन केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर यांनी दिली. होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला व्यक्ती बाहेर फिरत असल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींवर व वाहनांवर तब्बल 1 हजार 100 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍याच्या ग्रामीण भागात आलेल्या व्यक्तींना शाळेत इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात येत आहे. करमाळा शहरात आलेल्या व्यक्तींसाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, डॉ. आंबेडकर वसतिगृह आणि आयटीआय या तीन ठिकाणी इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात येत आहे. करमाळ्यातील अथर्व मंगल कार्यालयातही इन्स्टिट्युन्शलन क्वारंटाईनसाठी दोनशे बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा व्यक्तींना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यासाठी करमाळ्यातील लॉज प्रशासनाच्यावतीने ताब्यात घेण्यात आले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्याच्या तुलनेत करमाळा तालुक्‍यातील प्रशासनाने केलेली ही उपाय योजना करमाळा तालुका कोरोनामुक्‍त ठेवण्यास महत्त्वाची ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three districts border karmala taluka remain free from corona