पोलिस आयुक्‍तांचा दणका ! महिन्यात सहावा पोलिस बडतर्फ; वाचा सोलापुरातील गुन्हेगारी 

तात्या लांडगे
Wednesday, 16 September 2020

यांना केले बडतर्फ 

  • राजकुमार बाबुराव श्रीमान (पोलिस मुख्यालय) 
  • स्टिफन स्वामी (जेलरोड पोलिस ठाणे) 
  • कोरबू (सलगर वस्ती पोलिस ठाणे) 
  • किर्तीराज अडगळे (विजापूर नाका पोलिस ठाणे) 
  • जयप्रकाश कांबळे (विजापूर नाका पोलिस ठाणे) 
  • विकी गायकवाड (विजापूर नाका पोलिस ठाणे)

सोलापूर : शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी थेट एका महिन्यात थेट घरचा रस्ता दाखविला आहे. सध्या पोलिस मुख्यालयात नियुक्‍त राजकुमार बाबुराव श्रीमान यास बुधवारी (ता. 16) आयुक्‍तांनी बडतर्फ केले.

 

कर्तव्यावर असताना कर्तव्याचे पालन न करणे, गुन्हेगारांच्या हितासाठी तसेच गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी पदाचा गैरवापर केला. अप्रामाणिकपणा, बेशिस्तपणा, बेजबाबदारपणा आणि गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचा ठपका ठेवत श्रीमानला पोलिस आयुक्‍तांनी थेट बडतर्फच केले. तत्पूर्वी, विजापूर नाका पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई विकी गायकवाड यास अवैध वाळू व्यवसायात भागिदारी असल्याने, तर दरोड्यातील गुन्ह्यात सहभाग असलेल्या किर्तीपाल अडगळे, जयप्रकाश कांबळे यांना पोलिस आयुक्‍तांनी बडतर्फ केले होते. त्यानंतर सलगर वस्ती पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई कोरबू यालाही गुन्हेगारांशी हितसंबंध जोपासल्याप्रकरणी आयुक्‍तांनी घरी पाठविले होते. तर अशोक चौक परिसरातील मटका बुकी व्यवसायात भागिदारी असल्याचा ठपका ठेवत जेलरोड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई स्टीफन स्वामी आणि आता श्रीमान यांनाही पोलिस आयुक्‍त शिंदे यांनी थेट बडतर्फच केले आहे. 

 

सावकाराच्या त्रासाला कंटाळून घेतला गळफास 
सोलापूर : देगाव रोडवरील जुनी लक्ष्मी चाळ येथील अनिल नागनाथ चांगभले (वय 50) यांनी सावकाराच्या त्रासाला कंटाळून घराजवळील वाचनालयात गळफास घेतला. त्यांना बेशुध्द आवस्थेत त्यांचे जावई श्रीकृष्ण भोसले यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली असून त्याची माहिती सलगर वस्ती पोलिसांना कळविण्यात आली आहे. याबाबत सलगर वस्ती पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

 

'स्मृती ऑर्गनिक्‍स'ची 76 लाखांची फसवणूक 
सोलापूर : स्मृती ऑर्गनिक्‍स लिमिटेड कंपनी मूलभूत औषध उत्पादने तयार करुन जगभरातील विविध कंपन्यांना पुरवठा करते. कंपनीने 20 जुलै 2019 रोजी या कंपनीने फॉर्च्युन थेरपिटिक्‍स एल. एल. पी. हैदराबाद या कंपनीकडून लोसार्टन पोटॅशियम युएसपीयु या मुलभूत औषधाची मागणी कळविण्यात आली. त्यानुसार एक हजार किलोग्रॅम मुलभूत औषध 25 जुलैला वितरीत करण्यात आले. त्यानंतर 60 दिवसांत संबंधित कंपनीकडून त्याची किंमत मिळणे अपेक्षित होते. मात्र, फॉर्च्युन थेरपिटिक्‍स एल. एल. पी. हैदराबाद या कंपनीने 76 लाख 70 हजार रुपये दिलेच नाहीत, अशी फिर्याद स्मृती ऑर्गनिक्‍स कंपनीचे अधिकारी विजय रामचंद्र चांगले यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे. हैदराबाद येथील कंपनीने दिलेले धनादेशही वटलेले नाहीत, असेही फिर्यादी नमूद आहे. त्यानुसार पोलिसांनी गोयल नवीन कुमार (रा. हैदराबाद) आणि मुरली नारायण कुरापाटी (रा. मुंबई) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Towards the sixth police bar in the month solapur city police commissioner action