पंढरपुरातून शनिवारी जोधपूरला तर सोलापुरातून रविवारी हावडाला जाणार रेल्वे

प्रमोद बोडके
शुक्रवार, 22 मे 2020

उद्या शनिवारी 23 मे रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथून जोधपूरला (राजस्थान) 1434 जणांना घेऊन ट्रेन रवाना होणार आहे. रविवारी 24 मे रोजी दुपारी दोन वाजता सोलापुरातून हावडा (पश्चिम बंगाल) येथे 1486 जणांना घेऊन ट्रेन रवाना होणार आहे.

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या लॉक डाऊन मध्ये परराज्यातील कामगार, धार्मिक यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी सोलापूर जिल्ह्यात अडकले आहेत. या व्यक्तींना सुखरूप त्यांच्या जिल्ह्यात पोहोच करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

उद्या शनिवारी 23 मे रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथून जोधपूरला (राजस्थान) 1434 जणांना घेऊन ट्रेन रवाना होणार आहे. रविवारी 24 मे रोजी दुपारी दोन वाजता सोलापुरातून हावडा (पश्चिम बंगाल) येथे 1486 जणांना घेऊन ट्रेन रवाना होणार आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत आठ ट्रेनच्या माध्यमातून दहा हजार 43 जणांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात आले आहे. तिरुचिरापल्ली, लखनऊ, जसिडिह, सहरसा, पाटलीपुत्र याठिकाणी पंढरपूर, कुर्डुवाडी, सोलापूर येथून ट्रेन पाठविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 57 हजार 176 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 46 हजार 174 जणांना रवाना करण्यात आले आहे. 11 हजार 2 व्यक्ती अद्यापही शिल्लक आहेत. सोलापुरातून इतर राज्यात व्यक्तींना पाठविण्यासाठी 29 हजार 932 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 23 हजार 255 जणांना रवाना करण्यात आले असून 6 हजार 677 जण शिल्लक असल्याची माहितीही अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The train will run from Pandharpur to Jodhpur on Saturday and from Solapur to Howrah on Sunday