माजी आमदार शेख यांना श्रद्धांजली वाहताना शरद पवार काय म्हणाले वाचा

अशोक मुरुमकर
Sunday, 14 June 2020

सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांना शरद पवार यांनी ट्विटरद्‌वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. शेख हे ८० वर्षाचे होते. त्यांना सोलापुरातील अश्‍विनी रुग्णालयात शनिवारी दाखल केले होते.

सोलापूर : सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांना शरद पवार यांनी ट्विटरद्‌वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. शेख हे ८० वर्षाचे होते. त्यांना सोलापुरातील अश्‍विनी रुग्णालयात शनिवारी दाखल केले होते. उपचार सुरु असताना रविवारी (ता. १४) सकाळी साडेआकरा वाजता निधन झाले.
माजी आमदार युन्नूसभाई शेख हे १९७९, १९७५ आणि १९८५ अशा तीन वेळा सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांना श्रद्धांजली वाहताना अजित पवार यांनी म्हटले की,

‘माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे सोलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या विविध प्रश्‍नासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे. सोलापूरकर त्यांचे योगदान कायम स्मरणात ठेवतील.’ १९७५ मध्ये शरद पवार हे सोलापूरचे पालकमंत्री असताना शेख यांना निवडून आणून महापौर केले होते. त्यांनी स्थायी समितीच्या अध्यक्षपदीही काम पाहिले होते. १९९० मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. १९९८ मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.  

 

माजी आमदार युन्नूसभाई शेख यांना श्रद्धांजली अर्पण करताना शरद पवार यांनी म्हटलंय की, ‘माझे विश्वासू सहकारी माजी आमदार व सोलापूरचे माजी महापौर युनुसभाई शेख यांचे निधन चटका लावणारे आहे. सोलापूर शहराच्या विकासात युनुसभाईंचे मोठे योगदान आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात अविरत सक्रिय उमदे नेतृत्व हरपले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tributes paid to former MLA Sheikh by Sharad Pawar and Ajit Pawar on Twitter