दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू : वाचा सोलापुरातील गुन्हेगारी वृत्त 

crime.jpg
crime.jpg

सोलापूर : निलम नगर ते सत्तर फूट रोड या दरम्यान दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना आदर्श नगर, श्रीदत्त स्टील फर्निचर दुकानासमोर घडली. दुचाकीस्वार सिद्धलिंग लक्कण्णा जवळी उर्फ पुजारी (रा. ढंगापूर, ता. आळंद, जि. कलबुर्गी) याने त्याच्याकडील दुचाकी निष्काळजीपणाने व भरधाव वेगाने चालविली. त्यातच दुचाकीचा (एमएच- 42, सी- 2831) ताबा सुटला आणि तो दुभाजकला धडकला, अशी फिर्याद सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर सरवदे यांनी एमआयडीसी पोलीसांत दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. जाधव हे करीत आहेत. 


हौसे वस्ती येथून पळविली रिक्षा 

सोलापूर : हौसे वस्ती (आमराई, लक्ष्मी पेठ) येथून चोरट्याने घरासमोर लावलेली रिक्षा चोरून नेली आहे. समाधान कैलास ढेकळे (रा. वैराग, ता. बार्शी) याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरासमोर लावलेली रिक्षा ढेकळे याने संमतीविना चोरुन नेल्याचे दिगंबर दामोदर पांढरे यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. शेख हे करीत आहेत. 

किसन नगरात दागिन्यांची चोरी 

सोलापूर : किसान नगर (अक्‍कलकोट रोड, हनुमान मंदिराजवळ) येथे घर फोडून चोरट्याने दागिन्यांसह रोकड चोरून नेल्याची फिर्याद सिद्धाराम बसप्पा प्याटी यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. चोरट्याने घराचा लाकडी दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात खुंटीला अडकवून ठेवलेल्या पर्समधील पाच हजार रुपये आणि दागिने लंपास केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. चव्हाण हे करीत आहेत. 


जनावरांची बेकायदेशीर वाहतूक 

सोलापूर : जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या वाहतूक केल्याप्रकरणी जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मार्केट यार्डमागील सार्वजनिक रोडवर ही कारवाई करण्यात आली. सिद्राम कृष्णहरी चरकुपल्ली (रा. प्रियदर्शनी नगर, जुना विडी घरकुल) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. वाहनचालक वाहन (एमएच- 13, सीजे- 0611) सोडून पसार होण्यात यशस्वी ठरले. पोलिसांनी वाहनासह जनावरे ताब्यात घेतली आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. राठोड हे करीत आहेत. 

ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला 

सोलापूर ः संस्थेच्या अंतर्गत वादातून ज्ञाती संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून एकूण सोळा जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्राम नरसय्या तट्टे (रा. नागेंद्र नगर, कुमठा नाका) यांची ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांसह संस्थेत आले, त्यावेळी यापूर्वीच्या अध्यक्षांनी प्रवेशद्वार तसेच इमारतीच्या विविध ठिकाणच्या दरवाजांना लावलेले टाळे काढले. त्याठिकाणी नवीन कुलूप लावण्याचे काम हाती घेतले. त्यावेळी श्रीनिवास गडगी त्याठिकाणी आले आणि त्याने तू कोण अशी अरेरावीची भाषा अध्यक्षांना वापरली. त्यानंतर गडगीने अध्यक्षांचा शर्ट पकडून कानफटात मारली आणि लोखंडीपट्टीनेही बेदम मारहाण करीत गळा आवळला, अशी फिर्याद तट्टे यांनी दिली. तर संस्थेच्या रोखपाल निशा केंचीगुंडी यांनीही पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सिद्राम तट्टे यांच्यासह एकूण 16 जणांविरुद्ध गुन्हा केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. शेख करीत आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com