घाट दुर्घटनेतील दोन मृत महिलांची अद्याप ओळख पटली नाही 

अभय जोशी 
Saturday, 24 October 2020

चंद्रभागा नदीच्या तीरावरील घाटाची भिंत कोसळून 14 ऑक्‍टोबर रोजी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोन महिलांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्या महिला जळगाव किंवा नाशिक जिल्ह्यातील असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.

पंढरपूर (सोलापूर) : चंद्रभागा नदीच्या तीरावरील घाटाची भिंत कोसळून 14 ऑक्‍टोबर रोजी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी दोन महिलांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्या महिला जळगाव किंवा नाशिक जिल्ह्यातील असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. 

येथील चंद्रभागा नदीच्या तीरावर जलसंपदा विभागाच्या माध्यमातून घाट बांधण्याचे काम सुरू आहे. 14 ऑक्‍टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घाटाची भिंत कोसळून पंढरपूर येथील अभंगराव कुटुंबातील चार आणि अन्य दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत ज्या दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे, त्यांची ओळख पोलिसांना अद्याप पटलेली नाही. पोलिसांच्या आतापर्यंतच्या चौकशीत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन वारकरी महिला जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. 

या दोन महिलांपैकी एक महिला 55 ते 60 वयाची असून बांधा मध्यम आहे. उंची अंदाजे 158 सेमी असून वर्ण निमगोरा आहे. नाक सरळ असून पोटावर तीळ आहे. केस पांढरे आहेत. आकाशी रंगाची साडी, काळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. 

दुसरी महिला 50 ते 55 वयाची असून त्या महिलेचा बांधा मध्यम आहे. उंची अंदाजे 159 सेमी असून वर्ण निमगोरा आहे. केस काळे - पांढरे असून अंगात लाल रंगाचा स्वेटर, पिवळ्या - गुलाबी रंगाची साडी आणि गुलाबी रंगाचा ब्लाऊज आहे. कोणाला या महिलांच्या संदर्भात माहिती असल्यास पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण पवार (मो. नं. 9821919915) यांच्याशी संर्पक साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two women who died in the ghat accident have not been identified yet