उद्धवा, अजब तुझे सरकार..! पंढरपुरात लोककलावंतांचे अनोखे आंदोलन 

अभय जोशी 
Wednesday, 23 September 2020

राज्यात आणि देशातील गावागावात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे कलावंतांची उपासमार सुरु आहे अशा परिस्थितीत शासकीय नियमांचे पालन करुन राज्यातील कलावंतांना कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्या कलावंतांच्या वतीने करण्यात आल्या. 

पंढरपूर (सोलापूर) : उद्धवा अजब तुझे सरकार... असे म्हणत एकतारी भजनी कलाकार, शाहीर, वाघ्यामुरळी यांच्यासह अनेक लोककलाकारांनी त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपआपल्या कला सादर करुन आज येथील तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. 
स्वरांजली ग्रुपचे संस्थापक, कलाकार गणेश गोडबोले यांनी लोककलावंताच्या मागण्यांसाठी आजपासून तहसील कचेरीसमोर सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बॅन्डवाले, गायक, वादक, मंडप व्यावसायिकांसह अनेक जणांनी हजेरी लावली. उपोषणाला पाठींबा देण्यासाठी भारुडकार चंदाताई तिवाडी, प्रसिध्द गायक दिलीप टोमके यांच्यासह महाराष्ट्र राज्य वाघ्यामुरळी परिषदेचे शाहीर सुभाष गोरे, सुयोग कलामंचचे रविंद्र शेवडे, अखिल भारतीय शाहीर परिषदेचे विजयकुमार व्यवहारे, परशुराम पवार, शाहीर नंदकुमार पाटोळे, विनय महाराज बडवे, अरुण जोशी, वैभव जोशी, साउंड मंडप असोसिएशनचे अध्यक्ष भगवानराव मनमाडकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, नाट्य परिषदेचे राजभाऊ उराडे, बाळासाहेब गोडबोले, पार्थ बेणारे आदी उपोषणस्थळी आले होते. शहर व तालुक्‍यातील लोक कलाकार, बॅन्ड पार्टी कलाकारांनी आपआपल्या कलांचे सादरीकरण करुन परिसर दणाणून सोडला. लोककलावंतांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार गणेश गोडबोले यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 
कलाकारांच्या वतीने देण्यात आलेले मागण्यांचे निवेदन : राज्यात आणि देशातील गावागावात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे कलावंतांची उपासमार सुरु आहे अशा परिस्थितीत शासकीय नियमांचे पालन करुन राज्यातील कलावंतांना कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, सध्या कलाकारांचे कार्यक्रम बंद असल्यामुळे हे सर्व जण आर्थिक अडचणीत आले असल्याने चालू शैक्षणिक वर्षाची शाळा व महाविद्यालयातून घेतली जाणारी विद्यार्थ्याची फी माफ करावी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कलावंताना तातडीने मदत मिळावी, कलाकारांना लघु उद्योगास विनाअट अनुदान द्यावे, कलाकारांना व्यवसायासाठी विनाअट नगरपरिषदेच्या मालकीचे गाळे नाममात्र भाडे तत्वावर विना डिपॉझिट उपलब्ध करुन द्यावेत, राज्य शासनाकडून वृध्द कलावंतांना मानधन योजनेतील श्रेणी रद्द करुन वयाच्या अटीनुसार पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे. पंढरपूर शहर आणि तालुक्‍यातील कलावंतांसाठी कलानगरी निर्माण करावी व हक्काचे घर मिळावे, कलावंतांना उत्पन्नाची अट न लावता बीपीएल शिधापत्रिका देण्यात याव्यात. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhva strange your government A unique movement of folk artists in Pandharpur