काय आहे वाचा वकिलांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे वकील परिषद पार पडली. या परिषदेत झालेल्या महत्त्वाच्या विषयांची माहिती ऍड. सलगर यांनी दिली. खटल्यांचा लवकर निपटारा होण्यासाठी काय करता येईल, याबाबत परिषदेत विचारमंथन झाल्याचे ऍड. सलगर यांनी सांगितले.

सोलापूर : इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा वापर वाढवून जलदगतीने न्यायदान करता येईल का? समन्स बजावण्यासाठी व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलचा वापर केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचा वेळ वाचेल, असा सूर नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय वकील परिषदेत निघाल्याचे सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज सलगर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

 

हेही वाचा - बुलाती है, मगर जानेका नहीं..!

 

इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या वापराबाबत सूर
महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या वतीने 15 आणि 16 फेब्रुवारीला नाशिक येथे वकील परिषद पार पडली. महाराष्ट्र आणि गोव्यातील पाच हजारांहून अधिक वकील या परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत सोलापूर बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातून जवळपास 200 वकिलांनी सहभाग नोंदविला. परिषदेत झालेल्या महत्त्वाच्या विषयांची माहिती ऍड. सलगर यांनी दिली. खटल्यांचा लवकर निपटारा होण्यासाठी काय करता येईल, याबाबत परिषदेत विचारमंथन झाल्याचे ऍड. सलगर यांनी सांगितले. "अनेक प्रकरणे वेळेत समन्स बजावले नसल्याने प्रलंबित असल्याचे समोर आले. यावर उपाय म्हणून व्हॉट्‌सऍप आणि ई-मेलच्या माध्यमातून समन्स पाठवता येईल का, याबाबत या वेळी चर्चा झाली. न्यायालयीन प्रक्रियेत नवीन इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा वापर करावा, असा कायदा भारतीय पुरावा कायदा 2000 अंतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे ई-मेल आणि व्हॉट्‌सऍपचा वापर करायला हवा, असा सूर परिषदेतून समोर आल्याचे ऍड. सलगर म्हणाले. लवकर न्याय देताना कोणावर अन्याय होऊ नये यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर मुख्य सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी मार्गदर्शन केल्याचे ऍड. सलगर यांनी सांगितले.

अलीकडे बहुतांश गुन्ह्यांत सोशल मीडियावरील माहितीचा पुरावा म्हणून वापर केला जात आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत नव्या माध्यमांचा वापर करावा अशी वकिलांची मागणी आहे. लोकांत आजही बदला घेण्याची मानसिकता दिसून येते, त्यामुळेच न्यायालयात खटल्याची संख्या वाढत आहे. लोकांनी मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. न्यायालयात न जाता आपली प्रकरणे मिटवता येतील का, हे पाहायला हवे.
- बसवराज सलगर,
अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of digital media in the judicial process