जे लोकप्रतिनिधी ओबीसी आरक्षणाला विरोध करतील, त्यांना जिवात जीव असेपर्यंत मतदान करायचे नाही ! गोलमेज परिषदेतील सूर 

राजकुमार शहा 
Thursday, 12 November 2020

जे आमदार, खासदार व मंत्री ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना जिवात जीव असेपर्यंत मतदान करणार नाही, असा पवित्रा सुद्धा या परिषदेच्या निमित्ताने आपण घेतला पाहिजे, असे आवाहन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले.

मोहोळ (सोलापूर) : राज्यामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाचा गदारोळ सुरू आहे, तो पाहता येणाऱ्या काळामध्ये ओबीसी बांधवांनी रस्त्यावर उतरून आरक्षण बचावाची भूमिका घेतली पाहिजे. जे आमदार, खासदार व मंत्री ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतील, त्यांना जिवात जीव असेपर्यंत मतदान करणार नाही, असा पवित्रा सुद्धा या परिषदेच्या निमित्ताने आपण घेतला पाहिजे, असे आवाहन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले. 

ओबीसी संदर्भात सध्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत व पुढील भूमिका ठराविण्यासाठी मुंबई येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बारसकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकाश शेंडगे होते. या वेळी मंचावर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, बापट आयोगाचे सदस्य लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब सानप, मच्छिंद्र कांबळे, रेणुका येणके यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी मंत्री वडेट्टीवार म्हणाले, आम्ही जी भूमिका मांडतोय ती सत्य मांडतोय. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही. ओबीसीची भूमिका यापुढेही अशीच राहील, असे सांगून, मंत्री म्हणून काम करताना सारथी या संस्थेला ज्याप्रमाणे निधी उपलब्ध होतो व नवीन योजनेचे फायदे मिळतात, त्याचप्रमाणे महा ज्योतसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रकाश शेंडगे म्हणाले, जर कोणी तलवारीची भाषा वापरत असेल तर त्यास जशास तसे उतर देऊ. करमाळयाचे आमदार संजय शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे. त्याचा या वेळी निषेध करण्यात आला. यापुढे आमदार, खासदार व मंत्र्यांची भूमिका ओबीसी विरोधात राहिल्यास "ओबीसीची वारी आमदारांच्या घरी' यानुसार आंदोलन छेडण्यात येईल. 

या वेळी बाळासाहेब सानप, मच्छिंद्र भोसले, लक्ष्मण गायकवाड यांनीही मनोगते व्यक्त केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various dignitaries presented their views at the Golmej Parishad on OBC held in Mumbai