काय हा छंदिस्ट ! देशविदेशांतील 50 हजार पोस्टाची तिकिटे, शेकडो पुरातन नाणी व चलनी नोटांचा केला संग्रह 

राजशेखर चोधरी 
Monday, 28 September 2020

अक्कलकोट शहरातील घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय करून आपले रोजचे व्यवहार चालविणाऱ्या विजय दत्तात्रय शिंदे यांनी आजपर्यंत जगातील सर्वच देशांतील सुमारे 50 हजार टपाल तिकिटे, 700 नाणी आणि शेकडो चलनी नोटा जमा करण्याचा छंद जोपासला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी प्रारंभी सात तिकिटे गोळा करून सुरू झालेला प्रवास हा आता वयाची 55 वर्षे झाल्यानंतरही निरंतर सुरूच आहे. 

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय करून आपले रोजचे व्यवहार चालविणाऱ्या विजय दत्तात्रय शिंदे यांनी आजपर्यंत जगातील सर्वच देशांतील सुमारे 50 हजार टपाल तिकिटे, 700 नाणी आणि शेकडो चलनी नोटा जमा करण्याचा छंद जोपासला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी प्रारंभी सात तिकिटे गोळा करून सुरू झालेला या छंदिस्टाचा प्रवास हा आता वयाची 55 वर्षे झाल्यानंतरही निरंतर सुरूच आहे. 

No photo description available.

पत्र मैत्रीतून मिळाली आयुष्याची जोडीदार 
विजय शिंदे यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाचे अक्कलकोट तालुक्‍यातील मित्रपरिवार व नागरिकांत मात्र विलक्षण कुतूहल निर्माण झाले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाच्या प्रवासाविषयी अधिक माहिती अशी, की सुरवातीस घराशेजारी राहणारे मित्र सुरेश कोरे यांनी सात तिकिटे दिली. त्यावरील आकर्षक रंगसंगती व चित्रे पाहून त्यांना अधिक तिकिटे गोळा करण्याची आवड निर्माण झाली. त्यातून त्यांना पत्र मैत्रीची कल्पना सुचली आणि देशविदेशांतील 150 मित्र-मैत्रिणी जोडल्या आणि त्यांच्याद्वारे हजारो तिकिटे व नाणी त्यांना प्राप्त होत गेली. त्याने त्यांची आवड नाणी आणि नोटा गोळा करण्याकडे वाढली. याच छंदातून त्यांना त्यांच्या आयुष्याची जोडीदार मिळविण्याचे भाग्य देखील लाभले. 

No photo description available.

35 प्रदर्शनांतून मिळवले सात ब्रॉंझपदके 
तिकिटे मिळविण्यासाठी मार्ग शोधत असताना पुण्याच्या सोशल सर्कलचे सभासद झाले व संग्रह वाढत गेला. या पत्र मैत्रीतील स्वित्झर्लंडचे भक्त शिवपुरी येथे दर्शनास आल्यानंतर त्यांनी पाच परदेशी तिकिटे व काही नाणी त्यांना दिली. त्यातून पुन्हा आवड निर्माण होत गेला. त्यांना मोठी मदत झाली ती रद्दी कारखान्यात काम करणारे मित्र (कै.) अरुण कुलकर्णी यांची. त्यांच्याद्वारे त्यांना शेकडो पोस्ट कार्डस्‌ व तिकिटे संग्रही ठेवता आली आहेत.
 

No photo description available.

शिंदे यांना आजपर्यंत महाराष्ट्र व कर्नाटक येथील एकूण 35 विविध प्रदर्शनांत भाग घेऊन त्यातून सात ब्रॉंझपदके देखील प्राप्त झाली आहेत. आजघडीला त्यांच्याकडे 200 देशांतील तिकिटे, 130 देशांच्या नोटा ज्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका आदींचा समावेश आहे. त्यांच्याकडील संग्रहात शिवकालीन, आदिलशाही, निजामशाही, राणाप्रताप मेवाड घराणे, इंदूर व ग्वाल्हेर घराणे यांच्या नाण्यांचा तर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यापासून अलीकडील सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंतची तिकिटे यांचा समावेश आहे. 

No photo description available.

इंग्लंडच्या राजघराण्यातील प्रत्येक कार्यक्रमास पाठविली शुभेच्छापत्रे 
केवळ पोस्टाची तिकिटे, नाणी व नोटा गोळा करणे यावर न थांबता त्यांच्याकडे खुद्द अक्कलकोट संस्थांनची, बडोदा व कुरुंदवाड संस्थानची कोर्ट फी व पोस्ट यांची तिकिटेसुद्धा आहेत. त्याचबरोबर काश्‍मीर व हैदराबाद संस्थानांची तिकिटे सुद्धा संग्रही आहेत. शिंदे यांनी इंग्लंडच्या राजघराण्यातील प्रत्येक कार्यक्रमास आजपर्यंत शुभेच्छापत्रे पाठविली आहेत. त्या बदल्यात आजपर्यंत जवळपास पंधरा वेळा तिथल्या राजघराण्यातील लग्न व विविध कार्यक्रमांचे त्यांनी प्रकाशित केलेली तिकिटे व त्यांचे फोटो मात्र त्यांना नियमितपणे मिळत आहेत. त्यातून इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा वाढदिवस, प्रिन्स विल्यम व केंट यांचा साखरपुडा तसेच प्रिन्स जॉर्ज आदींच्या संदर्भातील 700 ते 800 तिकिटे त्यांना प्राप्त झाली आहेत. अशा आगळ्यावेगळ्या, मनाचा उत्साह वाढविणारा आणि जीवनात आनंद निर्माण करीत असलेला हा छंद मात्र त्यांच्या संपूर्ण जीवनात आरोग्यमय वातावरण सतत राहण्यास मदत करणारा व स्फूर्ती देणारा ठरत आहे, हे मात्र नक्की. 

No photo description available.
विजय दत्तात्रय शिंदे

संग्रहाच्या अभ्यासासाठी विद्यार्थी व अभ्यासकांना सहकार्य मिळणे अपेक्षित 
आपल्या या छंदाबद्दल विजय शिंदे म्हणाले, माझ्या या पंचेचाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या आवडीने मला मानसिक समाधान लाभत असून, माझा दिवसभराचा थकवा देखील यामुळे निघून जात असतो. हा छंद जरा खर्चिक असूनही तो व्यसनांपासून अलिप्त राहण्यास मदत करीत आहे. हा छंद मी माझा व्यवसाय सांभाळून करीत आहे. येत्या काळात माझा हा तिकीट संग्रह एक लाखांपर्यंत करण्याचा मनोदय आहे. त्याला मित्र परिवाराचे मिळणारे सहकार्य देखील मोलाचे ठरणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना व ऐतिहासिक अभ्यासकांना या संग्रहाचा अभ्यास करण्यास सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Shinde who is hobbies of post tickets and hundreds of coins and notes from home and abroad