Success Story : दुसरीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले; कुणाची साथ नसतानाही एमपीएससीतून विशाल झाले 'आरटीओ' !

सुस्मिता वडतिले 
Wednesday, 2 December 2020

घरामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी नाही आणि मार्गदर्शन करण्यासाठी कुणाची साथही नसताना आज तो सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) या पदावर पोचला असून, गेल्या एक वर्षापासून पनवेल येथे कार्यरत आहे. 

पुणे : प्रत्येकाच्या यशाच्या मागे संघर्ष असतोच. त्यातूनही न डगमगता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जो तो प्रयत्न करतो आणि यशाला गवसणी घालतोच. त्यातीलच एक मोहोळ तालुक्‍यातील विशाल सुपेकर. वडिलांचे छत्र हरपल्यावर खचून न जाता त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. घरामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी नाही आणि मार्गदर्शन करण्यासाठी कुणाची साथही नसताना आज तो सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) या पदावर पोचला असून, गेल्या एक वर्षापासून पनवेल येथे कार्यरत आहे. 

विशाल हा सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्याच्या घरची परिस्थिती जेमतेमच. तो दुसरीत शिकत असतानाच वडिलांचे छत्र हरपले आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तेव्हापासून त्याला आईची साथ मिळाली. आज त्याचे वय 27 सुरू असून त्याच्या कुटुंबात आई, दोन बहिणी आणि तो असे चौघे एकत्र मिळून राहतात. वडील गेल्यावर त्यांच्या आजोबांनी सर्वांना धीर देऊन जगणं शिकवलं. त्यांचा पारंपरिक बुरुड समाजातील बांबू-वाशाचा व्यवसाय आई सांभाळत आहे. आईला नेहमी आजोबांची साथ मिळत गेली. त्याच्या आईचे शिक्षण तसे आठवीच झालेले; पण तिचे व्यवहार अगदी चोख असल्यामुळे व्यवसाय योग्य पद्धतीने चालवत आहे. 

विशालला आठवीत असताना स्कॉलरशिप मिळायची, पण त्यासाठी सुरवातीला बॅंकेत अकाउंट उघडण्याकरिता डिपॉझिट भरण्यासाठी पैसे नव्हते. त्या वेळेस त्याच्या आईने कानातली फुले तोडून पैसे भरले. आईने कानातली फुले विकल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले. यावरूनच त्याने ठरवले, की आपणही कष्ट करायचे. नेहमीच काम करून थकल्यानंतर योग्य वेळी विश्रांती घेतली तर आपण आयुष्यभर धावू शकतो आणि जीवनाच्या शर्यतीत खरोखर पुढे पोचू शकतो. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे आणि आईवरचे ओझे कमी करणे, हेच मनात ठरवून विशालने जिद्दीच्या जोरावर त्याचे स्वप्न सत्यात उतरवले. 

विशाल हा घरातील असा एकमेव मुलगा, ज्याला दहावीत 92 टक्के गुण आणि बारावीमध्ये 88 टक्के गुण मिळाले. बारावी झाल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी लातूरला गेला. लातूरमधील वातावरण पूर्णतः स्पर्धेचं युग असल्यामुळे त्याला सुरवातीला खूप जड गेलं. त्यानंतर त्याने आणखीन जास्त अभ्यास वाढवला. पुढील अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्याला गेला. त्याला स्कॉलरशिप मिळत असल्यामुळे पुढील शिक्षण घेताना अडचणी कमी आल्या. कॉलेजमध्ये असताना एक्‍स्ट्रा सर्क्‍युलेटर ऍक्‍टिव्हिटीजमध्ये भाग घेतला. त्यामुळे त्याचे वेगवेगळ्या स्किल्स डेव्हलप झाल्या. अभियांत्रिकीचे शिक्षण 2016 ला पूर्ण झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला सुपेकर कुटुंबातील पहिलाच मुलगा. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याबद्दल सविस्तर अभ्यासाची माहिती जाणून घेण्यासाठी तयारीला लागला. 

स्पर्धा परीक्षेतूनच पुढे करिअर करायचे त्याने ठरवले. त्या वेळी घरच्यांची साथही मिळाली. पहिली परीक्षा दिली पण अपयश आले. त्यानंतर लहान नोकरी करत करतच अभ्यासाला नव्याने सुरवात केली. काही दिवसांनंतर सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ) या पदासाठी पदभरती निघाली आणि, 'यावेळी आपण पोस्ट काढायची' असा निर्धार पक्का केला अन्‌ या परीक्षेत मार्च 2018 ला उत्तीर्णही झाला. यश संपादन केल्यानंतर विशालच्या कुटुंबाचे आनंद गगनात मावत नव्हते. विशालने एक यशाची पायरी चढली असून, पुढची पायरी चढण्यासाठी तो आणखीन प्रयत्न करत आहे. 

स्पर्धेमुळे माणसाची क्षमता वाढते तसेच स्पर्धा परीक्षांमुळे बौद्धिक गुणवत्ताही वाढते. विद्यार्थ्यांनी अशा अनेक परीक्षांमध्ये भाग घेतला पाहिजे. कष्टाला दुसरा पर्याय नाही आणि ते केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. आपल्यासाठी ज्यांनी देह झिजवला त्यांच्या कष्टाची जाणीव आपण ठेवली पाहिजे. ही जाणीव जर आपण ठेवली तर आपण कुठेच कमी पडणार नाही. मोठी स्वप्ने पाहा आणि ती स्वप्ने पूर्ण होईपर्यंत शांत बसू नका.
- विशाल सुपेकर, सहायक मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vishal Supekar from Mohol taluka has succeeded in the post of Assistant Motor Vehicle Inspector