बार्शीत घडले माणूसकीचे दर्शन; सात लाख रुपये असलेली पर्स दिली परत ! 

प्रशांत काळे
Monday, 5 October 2020

पर्स परत मिळाल्याचा आनंद शेख कुटुंबाला गगनात मावेना. शेख यांनी लगेच 5 हजार रुपये काढले अन्‌ बिडवे यांना बक्षिस देण्याचा प्रयत्न केला पण बिडवे यांनी रक्कम स्वीकारली नाही. माणुसकी जीवंत आहे. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले यातच मला आनंद असल्याचे बिडवे यांनी यावेळी सांगितले. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी-कुर्डुवाडी निर्मनुष्य रस्ता... रात्रीचे साडेबारा वाजलेले... पोस्ट चौकात बाकड्याखाली लेडीज पर्स विसरलेली... कोणाचेही लक्ष गेले नसल्याने पर्स सुखरूप दिसली... पर्समधील सात लाख रुपये चोरी गेले नसल्याने निःश्वास सुटला... पाच हजाराचे बक्षिस देऊ केले पण स्वीकारले नाहीत. ही घटना सांगितली आहे ट्रॅव्हल्स बुकींग करणाऱ्या बार्शीतील यशपाल बिडवे यांनी. 
गोरेगाव (मुंबई) येथे जाण्यासाठी परंडा (जि. उस्मानाबाद) येथील शेख कुटुंबातील तिघांनी बार्शी येथून बिडवे यांच्याकडून लातूर-मुंबई ट्रॅव्हलचे शनिवारचे तिकीट बुकींग केले होते. त्यानुसार ते बार्शी येथील पोस्ट चौकात रात्री अकराच्या सुमारास आले. ट्रॅव्हल कंपनीची बस रात्री साडेअकराच्या दरम्यान येणार होती. पण अर्धा तास उशीरा आली. सिमरन शेख, त्यांचे सासरे व लहान मुलगा रात्री बाराच्या दरम्यान बसमध्ये बसले. बस मार्गस्थ झाली. बार्शीपासून दहा किलोमीटरपर्यंत बस जाताच सिमरन यांना पर्स नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बस थांबवली. बसमध्ये पर्स चोरी गेल्याचा संशय आला. बसमध्ये प्रवाशांचा गोंधळ सुरु झाला. शेख कुटुंबाने बस परत बार्शीला घेऊन जाण्याची चालकाला विनंती केली. बस चालकाने शेख कुटुंबाची समजूत काढून विचार केला अन्‌ तिकीट बुकींग केलेल्या बार्शीतील यशपाल बिडवे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी दुकान बंद करुन बिडवे घरी जात होते. चालकाने पर्सचे वर्णन सांगितल्याप्रमाणे त्याठिकाणी जाऊन बिडवे यांनी पाहिले असता प्रवाशांना बसण्यासाठी ठेवलेला लाकडी बाकडा उलटा करुन ठेवण्यात आला होता अन्‌ पर्स खाली पडलेली होती. पर्समध्ये काही आहे की नाही हे न पाहता स्वतःकडे ती घेतली आणि पर्स असल्याचे चालकाला, शेख कुटुंबास सांगितले. 
हा सर्व गोंधळ सुरु असताना बस खांडवीच्या पुढे रस्त्यावरच बाजूला थांबली होती. बिडवे पर्स घेऊन बस उभी असलेल्या ठिकाणी घेऊन पोहचले. तोपर्यंत रात्रीचा एक वाजला होता. पर्स शेख कुटुंबाच्या ताब्यात दिली अन्‌ शेख कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला. पर्स परत मिळाल्याचा आनंद शेख कुटुंबाला गगनात मावेना. शेख यांनी लगेच 5 हजार रुपये काढले अन्‌ बिडवे यांना बक्षिस देण्याचा प्रयत्न केला पण बिडवे यांनी रक्कम स्वीकारली नाही. माणुसकी जीवंत आहे. तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले यातच मला आनंद असल्याचे बिडवे यांनी यावेळी सांगितले. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The vision of humanity that happened in Barshi Returned purse worth Rs 7 lakh