
कोरोनाच्या महाभयंकर साथीने संपूर्ण जगाला जेरीला आणले आहे. त्यातच अतिवृष्टी, महापूर, यामुळे ओला दुष्काळ या सर्व आपत्तीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असताना, शेतकरी मात्र "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा' हा संदेश देत शेती करीत आहे. अशाच प्रकारे भोसे (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्याने डाळिंब या पिकामध्ये कलिंगडाचे आंतरपीक घेऊन खर्च वजा जाता सव्वादोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
भोसे (सोलापूर) : कोरोनाच्या महाभयंकर साथीने संपूर्ण जगाला जेरीला आणले आहे. त्यातच अतिवृष्टी, महापूर, यामुळे ओला दुष्काळ या सर्व आपत्तीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असताना, शेतकरी मात्र "मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा' हा संदेश देत शेती करीत आहे. अशाच प्रकारे भोसे (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्याने डाळिंब या पिकामध्ये कलिंगडाचे आंतरपीक घेऊन खर्च वजा जाता सव्वादोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
येथील दत्तात्रय विठ्ठल जमदाडे या शेतकऱ्याने सव्वा एकर डाळिंब बागेत ब्लॅक बॉस या जातीच्या कलिंगडाची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी कलिंगडाचे बी खरेदी केले व बालाजी हायटेक नर्सरीमध्ये रोपे तयार केली. त्यानंतर डाळिंबाच्या दोन ओळींमध्ये चार फुटांचे बेड तयार केले व त्यावर एक फुटाच्या अंतराने जोडओळी पद्धतीने आठ हजार रोपांची लागवड केली.
रोपे तयार करण्यासाठी 20 हजार रुपये, भेसळ डोस पाच हजार रुपये, फवारणी 10 हजार रुपये, लिक्विड डोस 10 हजार रुपये, कामगार व मल्चिंग 10 हजार असा एकूण 55 हजार रुपये खर्च आला असल्याचे श्री. जमदाडे यांनी सांगितले.
सव्वा एकर क्षेत्रावर साधारण 30 टन उत्पादन व चालू बाजारभाव नऊ रुपये प्रतिकिलो याप्रमाणे दोन लाख 70 हजार रुपये एकूण उत्पन्न होत असून, खर्च वजा जाता दोन लाख 15 हजार रुपये उत्पन्न मिळणार असल्याचेही श्री. जमदाडे यांनी सांगितले. यासाठी त्यांना सूरज भोंग व तात्या फाळके यांचे मार्गदर्शन लाभले.
परंपरागत शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न घेण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. विशेष म्हणजे, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली पाहिजे. शेतीमालाच्या बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. शेती नक्कीच फायद्याची ठरते.
- दत्तात्रय जमदाडे,
शेतकरी, भोसे
संपादन : श्रीनिवास दुध्याल