जुलैमध्ये मुदत संपणाऱ्या वडापूर, संजवाड, वडकबाळ, बोरुळ ग्रामपंचायतींचे काय? 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 26 जून 2020

महिनानिहाय मुदत संपणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या 
जुलै : 4 
ऑगस्ट : 122 
सप्टेंबर : 00 
ऑक्‍टोंबर : 6 
नोव्हेंबर : 520 
डिसेंबर : 6 
एकूण : 658 

 

सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने राज्यातील ग्रामपंचायतींबाबत काय निर्णय घेतला जातो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुलैमध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची मुदत संपत असून या ग्रामपंचायतींची निवडणूक होणार की प्रशासक येणार? या प्रश्‍नाने ग्रामस्थांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. अशा स्थितीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचे काय होणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जुलैमध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींची मुदत पूर्ण होत आहे. या चारही ग्रामपंचायती दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आहेत. संजवाड, वडापूर आणि वडकबाळ या तीन ग्रामपंचायतींची मुदत 30 जुलै रोजी संपत आहे. बोरुळ ग्रामपंचायतीची मुदत 29 जुलै रोजी संपत आहे. 
कोरोनाचे संकट येण्यापूर्वीपासूनच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आवश्‍यक असलेली प्रशासकिय तयारी करायला सुरुवात केली होती. कोरोनाचे संकट आल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली आहे. जुलै ते डिसेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत येत्या काळात संपत असल्याने राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What about Vadapur, Sanjwad, Vadakbal and Borul gram panchayats which expire in July?