शिलाई व्यवसाय का गेला तीन वर्षे मागे ?

श्रीनिवास दुध्याल
रविवार, 31 मे 2020

टेलर व्यावसायिकांचा मोठा सीझन असलेली लग्नसराई, आंबेडकर जयंती व रमजान ईद असे महत्त्वाचे सण या लॉकडाउनमुळे हातचे गेले. येथील काही टेलर दुकानदारांकडे कर्नाटकातून ग्राहक येतात. मात्र कोरोनामुळे सर्व व्यवसाय कोलमडला आहे. दोन महिन्यात मोठ्या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. 
छोट्या टेलर दुकानदारांचे ठरलेले ग्राहक फिरकलेच नाहीत. 

सोलापूर: टेलर व्यावसायिकांची मदार ही दरवर्षीच्या लग्नसराई व महत्त्वाच्या मोठ्या सणांवर असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांहून जास्त कालावधीपासून सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे टेलर व्यवसायाला खूप मोठा फटका बसला असून, हा व्यवसाय आता तीन वर्षे मागे पडल्याची चिंता टेलर व्यावसायिकांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. 

हेही वाचाः थर्मल स्कॅनरद्वारे विडी घरकुल परिसरात सर्वेक्षण 

टेलर व्यावसायिकांचा मोठा सीझन असलेली लग्नसराई, आंबेडकर जयंती व रमजान ईद असे महत्त्वाचे सण या लॉकडाउनमुळे हातचे गेले. येथील काही टेलर दुकानदारांकडे कर्नाटकातून ग्राहक येतात. मात्र कोरोनामुळे सर्व व्यवसाय कोलमडला आहे. दोन महिन्यात मोठ्या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. 
छोट्या टेलर दुकानदारांचे ठरलेले ग्राहक फिरकलेच नाहीत. 

हेही वाचाः ....अन्यथा आमच्यावर आत्महत्येची वेळ 

काही मोठे टेलर दुकानदार सणांसाठी सूटिंग, शर्टिंग व लग्न सोहळ्यासाठी लागणारे शेरवानीचे कापड, तयार जीन्स पॅंट, टी-शर्ट खरेदी करून स्टॉक ठेवले आहे. यासाठी लाखोंची गुंतवणूक केली आहे. मात्र लॉकडाउनमुळे पूर्ण व्यवसायावर पाणी फेरले गेले आहे. नफा तर लांबचीच गोष्ट राहिली, गुंतवणुकीसाठी बॅंकांमधून कर्ज काढले गेले; मात्र व्यवसायच न झाल्यामुळे तीन वर्षे हा व्यवसाय मागे पडला आहे. कामगारांची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आता पुढील दिवाळी, लग्न सराईवर भिस्त ठेवावी लागणार आहे, असे मत टेलर व्यावसायिकांनी व्यक्त केले. छोट्या टेलर व्यावसायिकांची तर खूपच बिकट अवस्था झाली आहे. सीझन असताना ठरलेल्या ग्राहकांवर हे दुकानदार अवलंबून असतात. कामगार व मालक घरचेच असल्याने त्यांना दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे. 

दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी 
शहरातील काही दुकाने व कामगार कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की यापुढे आपल्याला कोरोनाला सोबत घेऊन जगावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळून, सुरक्षा साधनांचा वापर करून सुरक्षित व्यवसाय करण्याची हमी देत आहोत. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला आठवड्यातून चार दिवस सकाळी 10 ते सायंकाळी सहापर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. 
- श्‍यामसुंदर विडप, टेलर 

आर्थिक संकट मोठे 
आमचे दुकान दोन-तीन मशिनचे आहे. लग्नसराई असो वा मोठे सण, ठरलेले ग्राहक येणारच याची खात्री असते. आंबेडकर जयंती व रमजान ईदमध्ये ठरलेले ग्राहक हमखास येतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे एकही ग्राहक आला नाही. खूप मोठे नुकसान झाले आहे. काही ग्राहकांनी फोनवरून कपडे शिवून देण्याची विनंती केली, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही नकार दिला. आता दुकाने उघडली नाही तर आर्थिक संकट ओढावेल. 
- बाबू यल्लाराम, टेलर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why the sewing business three years back?