यंदा पालखी मार्गांवरील गावे शांत; गावकऱ्यांना खंत सेवेस मुकल्याची 

रविवार, 28 जून 2020

विश्वास बसत नव्हता  आपल्या गावात पालखी येणार अशी नेहमीप्रमाणे आजही पहाटेपासून चाहूल लागली होती. पालखी न येणार यावर विश्‍वास बसत नव्हता. परंतु, मनोभावे श्रद्धा असेल तर साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. यानुसार आज तोंडले येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या विसाव्याच्या ठिकाणची पूजा करून आरती करण्यात आली. तेथे प्रसाद मिळाला यातच सर्वस्वी आनंद मिळाला व समाधान वाटले.  - श्रीरंग पाटील, माजी सरपंच, तोंडले 

बोंडले (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघणारे विविध संतांचे पालखी सोहळे कोरोना पार्श्‍वभूमीवर रद्द झाल्याने, पालखी महामार्गावरील माळशिरस तालुक्‍यातील तोंडले, बोंडले, दसूर येथील गावकऱ्यांत पालखी सोहळ्यातील लाखो वैष्णवांच्या अखंड सेवेस मुकल्याची खंत व्यक्त होत आहे. 
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाला भेटण्यासाठी निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान होऊन त्या वेगवेगळ्या मार्गाने परंपरेनुसार आज आषाढ शुद्ध अष्टमी दिवशी तोंडले-बोंडले येथे एकत्र येत असतात. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ठाकूरबुवा येथील गोल रिंगण, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील बोंडले येथील धावा, संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांच्या पादुकांची गुरू-शिष्याची भेट, संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचे नंदाच्या ओढ्यातील पाण्याने घातले जाणारे स्नान, असे अनेक प्रसंग सोहळ्यातील रूढी परंपरेनुसार आपणास येथे पाहवयास व अनुभवास मिळतात. सर्व पालखी सोहळ्यातील पाच ते सहा लाख वैष्णव वारकरी एकत्र आल्याने टाळ, मृदंग व हरिनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून जात असतो. हे सर्व होत असताना गावकरी मात्र पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे यथोचित आदरातिथ्य करण्यात व्यस्त असल्याचे पाहवयास मिळते. संत सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी तर संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे दुपारच्या विसाव्यासाठी थांबल्यापासून लाखो वैष्णवांच्या सेवेसाठी ग्रामस्थांचे हात झटू लागतात. संतांच्या पालख्यांचे मनोभावे स्वागत करणे, वारकऱ्यांच्या विसाव्याची सोय करणे, वारकऱ्यांना अन्नदान करणे यातच सर्व गावकरी मग्न असल्याचे पाहवयास मिळते. एखादा सण जसा आपण साजरा करतो तशा प्रकारे येथील रहिवासी भक्तिभावाने आनंदात वारकऱ्यांची सेवा करत असतो. पालखी सोहळा गावात आल्यापासून अखंड सेवेत असलेला गावकरी, पालखी सोहळे पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतरच तो विसावतो अशी स्थिती असते. 
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करणे हे भाग्यच समजणाऱ्या गावकऱ्यांना या सेवेत यावर्षी मात्र विघ्न आले. कोरोना रोगाच्या महाभयंकर महामारीने यंदा आषाढी एकादशीला पंढरपूरला येणारे पायी पालखी सोहळे शासनाने रद्द केले आणि अखंड वारकऱ्यांच्या सेवेशी कटिबद्ध असलेल्या गावकऱ्यांना सेवेस मुकावे लागले.