संगमेश्‍वर महाविद्यालयात यीनचे रस्ता सुरक्षा अभियान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

सकाळ माध्यम समूहाचे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" (यिन) आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत संगमेश्वर महाविद्यालयात आयोजित "रस्ता सुरक्षा" व्याख्यानात ते बोलत होते. 

सोलापूर  रस्त्यावर वाहन चालवताना दक्षता, स्वयंशिस्त व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हेच करेल जीवन सुरक्षा असे प्रतिपादन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रा. सारंग तारे यांनी केले. 
सकाळ माध्यम समूहाचे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" (यिन) आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत संगमेश्वर महाविद्यालयात आयोजित "रस्ता सुरक्षा" व्याख्यानात ते बोलत होते. 
प्रा.तारे म्हणाले, मोबाईल खराब होऊ नये, म्हणून आपण त्यासाठी स्क्रीन गार्ड, कव्हर घेतो, मोबाईल जपून वापरतो. पण त्यापेक्षाही लाखमोलाचा असणारा जीव वाहन चालवताना सुरक्षित राहण्यासाठी आपण जागरूक राहत नाही. दुचाकीसाठी महागडे किचेन खरेदी करतो. पण हेल्मेट खरेदी करीत नाही. हे आपण टाळले पाहिजे. कोणतेही वाहन असले की त्याची कागदपत्रे, चालक परवाना, विमा असणे आवश्‍यक आहे. रस्ता सुरक्षा ही कोणा एकाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक वाहनचालकांचे कर्तव्य आहे. काळजी घेतली नाही, तर शारीरिक इजा आणि आर्थिक नुकसान होते, याचा विचार करावा. शासन किंवा पोलिस हे नियम लागू करू शकतात. पण त्यांचे पालन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. रासेयो स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात वाहनचालकांनी प्रवास करीत असताना हेल्मेट वापरावे, सीटबेल्टचा वापर करावा, यासाठी जनजागृती केली. यावेळी रासेयो विभागप्रमुख प्रा. अण्णासाहेब साखरे, डॉ. संतोष मेटकरी उपस्थित होते. तेजस्विनी हलके हिने सूत्रसंचालन केले, तर अनिकेत फताटे याने आभार मानले. ऋषिकेश तमशेट्टी, सिद्धारूढ बिराजदार, बाळासाहेब कांबळे, शंकर चिवडशेट्टी, कार्तिक कुलकर्णी, निलेश उनकी आदी स्वयंसेवकांनी सहकार्य केले. यिन समन्वयक अभिजीत शिंदे यांनी संयोजन केले. 

मानवी चुकांमुळेच अपघात 
अपघाताच्या नैसर्गिक कारणांपेक्षा वाहनांचा अमर्याद वेग, ड्रायव्हिंगच्या सवयी, वाहनांची न केलेली दुरुस्ती व देखभाल आदी मानवी चुका वाढत्या अपघातास कारणीभूत आहेत. त्यामुळे सुरक्षित वाहन चालवा. वाहतुकीचे सर्व नियम पाळा, वाहतूक नियम, सुरक्षित ड्रायव्हिंगची पद्धत व वाहनांची योग्य देखभाल आदींबाबत माहिती देऊन आपल्या चुकांमुळे कोणाला इजा होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन प्रा. सारंग तारे यांनी केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yin's road safety campaign at Sangameshwar College