जकराया साखर कारखान्याने सॅनिटायझर निर्मितीमध्ये मिळवला राज्यात दुसरा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोना उच्चाटनाच्या प्रक्रियेत सॅनिटायझर हा महत्त्वाचा घटक आहे. शासनाने राज्यातील सॅनिटायझर उत्पादन करू इच्छिणाऱ्या साखर कारखान्यांचे प्रस्ताव मागविले होते. 

मोहोळ(सोलापूर)ः वटवटे(ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्याने गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत तीन लाख लिटर सॅनिटायझर उत्पादन करून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या माध्यमातून कारखान्याची सहा कोटी रुपयाची आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी दिली. 

हेही वाचाः तापमानाच्या अचुक नोंदीसाठी हेडबॅंड 

श्री. जाधव पुढे म्हणाले की, कोरोना उच्चाटनाच्या प्रक्रियेत सॅनिटायझर हा महत्त्वाचा घटक आहे. शासनाने राज्यातील सॅनिटायझर उत्पादन करू इच्छिणाऱ्या साखर कारखान्यांचे प्रस्ताव मागविले होते. 

हेही वाचाः सरकारने परवानगी दिल्यास महाविद्यालय सुरू करणार ः शिवशरण खेडगी 

त्यात मोहोळ तालुक्‍यातील जकराया साखर कारखान्याला सॅनीटायझर उत्पादनासाठी एकमेव परवानगी मिळाली. उत्पादित सॅनिटायझरचा दर्जा चांगला असल्यामुळे ते मुंबई, नागपूर, हैदराबाद, केरळ या सह अन्य ठिकाणी वितरित केले. सॅनीटायझर उत्पादनासाठी शासनाने पुन्हा डिसेंबर पर्यंत मुदत वाढवून दिल्याचेही जाधव यांनी सांगितले. 

गळीत हंगामाची पुर्वतयारी 
गळीत हंगाम 2020/ 21 ची तयारी पूर्ण झाली असून, गाळपासाठी कारखान्याकडे अकरा हजार हेक्‍टरची नोंद असून, चालू वर्षी कारखान्याचे पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. ऊस वाहतुकीसाठी 170 मोठे 200 लहान ट्रॅक्‍टर तर 500 बैल गाड्यांचे करार झाले आहेत. उसाच्या रसापासून पन्नास टक्के इथेनॉल व पन्नास टक्के साखर उत्पादित करण्याचे धोरण संचालक मंडळाने अवलंबले असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

दोन कोटी साठ लाख युनिटची वीज निर्मिती 
दरम्यान अद्यापही सहवीज निर्मिती व इथेनॉल प्रकल्प सुरू असून, सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून दोन कोटी साठ लाख युनिट वीज निर्मिती केली आहे, त्यापैकी दीड कोटी युनिट वीज महावितरणला वितरित केली आहे. इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून छत्तीस लाख लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. कारखान्याचा कर्मचारी वर्गाचे कष्ट व संचालक मंडळाचे योग्य नियोजन यामुळेच या सर्व गोष्टी शक्‍य झाल्या. 
- सचिन जाधव, कार्यकारी संचालक, जकराया सहकारी साखर कारखाना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zakaraya Sugar Factory ranks second in the state in sanitizer production