माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक होणार आदर्श शाळा म्हणून विकसित 

किरण चव्हाण 
Friday, 30 October 2020

शालेय शिक्षण विभागाने माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकची मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड केली आहे. राज्यातील 300 जिल्हा परिषद शाळांची यासाठी निवड करण्यात आली असून, त्यात माढ्यातील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. 

माढा (सोलापूर) : शालेय शिक्षण विभागाने माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकची मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड केली आहे. राज्यातील 300 जिल्हा परिषद शाळांची यासाठी निवड करण्यात आली असून, त्यात माढ्यातील जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. 

पहिली ते सातवीपर्यंत वर्ग, शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय बाबी, स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीतील वर्गखोल्या, क्रीडांगण, सायन्स लॅब, दळणवळणासाठी साधने, भविष्यात विद्यार्थी संख्या वाढल्यास इमारत वाढविण्यासाठी पुरेशी जागा व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता या शालेय शिक्षण विभागाने ठरवलेल्या निकषांत माढ्यातील शाळा बसत असल्याने या शाळेची निवड करण्यात आली आहे. अशा शाळांमध्ये मुलांचा शारीरिक, बौद्धिक व मानसिक विकास करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा, भाषण, लेखन, अभिनय, गायन व अन्य विषयांमध्ये प्रावीण्य मिळवून देण्यासाठी या शाळा विकसित करण्यात येणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पहिल्या टप्प्यात 300 शाळांची निवड केली असून माढा तालुक्‍यातून माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एकची निवड झाल्याने मुख्याध्यापक मालती तळेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धैर्यशील भांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. शाळेने 15 लाखांची लोकवर्गणी करून शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त केले असून, जिल्हा परिषदेचा आदर्श व्यवस्थापन समिती पुरस्कार, आचार्य दोंदे आदर्श शाळा पुरस्कारांसह शाळा तालुक्‍यात प्रगतिपथावर आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad Primary School in Madha number one will be developed as an ideal school