राजे निघाले राज्याभिषेकाला त्यांचे मावळे संगतीला..!

संदीप खांडेकर
शनिवार, 27 मे 2017

कोल्हापूर : रायगडाच्या पायथ्याखालील पायऱ्या चढून गडावर जायचे म्हटले, तर अनेकांना घाम फुटतो. पायऱ्यांपेक्षा रोप-वे बरा, असा विचारही मनात डोकावून जातो. पण, 265 किलोमीटर इतके अंतर पालखी घेऊन कोणी गडावर येत असेल तर..? पण, हे शिवधनुष्य पेलले आहे, ते पुण्यातील शिवधनुष्य प्रतिष्ठानने. प्रतिष्ठानतर्फे किल्ले शिवनेरीहून पायी पालखी सोहळ्यास सुरवात झाली असून ही पालखी पाच जूनला किल्ले रायगडावर पोचणार आहे. विशेष म्हणजे पालखी सोहळ्यातून "झाडे लावा झाडे जगवा,' असा संदेश दिला जात आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राज्याभिषेक सोहळा होतो. या सोहळ्यात वेगळ्या पद्धतीने सहभागी होण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीहून 24 मेस पालखी सोहळ्यास सुरवात झाली आहे. गडांच्या पायऱ्या, डोंगरातील पायवाटा, शहरातील डांबरी रस्त्यांवरून जाणाऱ्या पालखीचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केले जात आहे.

पालखी सोहळ्यातून लोककल्याणकारी जागर, व्याख्याने, पोवाडे, शस्त्र रिंगण (मर्दानी खेळ), अश्‍व रिंगण या कार्यक्रमांतून शिवछत्रपतींच्या शौर्याची महती सांगितली जात आहे.. शिवछत्रपतींचा इतिहास भावी पिढ्यांना कळावा, राज्याभिषेक सोहळा "लोकोत्सव' व्हावा, असा उद्देशही त्यामागे आहे. पालखी सोहळ्या दरम्यान पुण्यातील लालमहालात शिवधनुष्य पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तसेच 51 बाल शाहिरांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.

शिवनेरी, जुन्नर, आर्वी, नारायणगाव (कोल्हे मळा), मंचर, पेठ, राजगुरूनगर, चाकण, मोशी, भोसरी, दापोडी, खडकी, लाल महाल, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, स्वारगेट (जेधे चौक), सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे मार्ग), वडगाव धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, डोणजे फाटा, खानापूर, निगडेवसाडे, शिवशंभूस्मारक, कुरण, पानशेत, कादवेघाट, विहीर, धानेप, वेल्हे, भट्टी, केळद, मढे घाट, कर्नवडी, वाकी गावठाण, दहिवड, बिरवाडी, महाड, नाते, पाचाडमार्गे ही पालखी रायगडावर पाच जूनला पोचेल. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे पालखीचे पालखीचे स्वागत करतील. सहा जूनच्या मुख्य सोहळ्यात ही पालखी सहभागी असेल. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे, प्रशांत शिवणकर, हेमंत यादव, कैलास दोरगे, सागर दोरगे, शेखर तांबे, शिवाजी जाधव, मिलिंद नवगिरे, सुदेश कानडे, संदीप पाडळकर संयोजन करत आहेत.

ताज्या बातम्याः

Web Title: kolhapur news raigad shivaji maharaj rajyabhishek