बारामती : अजित पवार आघाडीवर| Election Results 2019

मिलिंद संगई
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणूकीसाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार असून, दुपारी एक वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामतीचा अभेद्य किल्ला यावेळेस गाेपीचंद पडळकर भेदणार का याचीच उत्सुकता आता लागली आहे.  

बारामती शहर : मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आघाडीवर आहेत. बारामतीचा अभेद्य किल्ला यावेळेस गाेपीचंद पडळकर भेदणार का याचीच उत्सुकता आता लागली आहे.  

दरम्यान, एमआयडीसीतील वखार मंडळाच्या गोदामात मतमोजणी केली जाणार असून सकाळी साडेसहा वाजता मतमोजणीसाठी सर्व कर्मचा-यांना बोलाविण्यात आले असून त्यांना प्रारंभी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सात वाजल्यापासून इतरांना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. 
पहिल्या टप्प्यात पोस्टल मतपत्रिका मोजल्या जाणार असून, त्यासाठी तीन स्वतंत्र टेबल्स ठेवण्यात आले आहेत.

साडेआठच्या सुमारास मतमोजणीचा पहिला राऊंड सुरु होईल. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल द्वारे मतमोजणी केली जाणार असून प्रत्येक राऊंडला 14 मतदान केंद्रातील 14 मशीनमधील मते मोजली जाणार आहेत. सर्व मशीन्सची मतमोजणी करण्यासाठी सहा तासांचा कालावधी अपेक्षित असून मतमोजणी सलगपणे केली जाणार आहे.

मतमोजणी झाल्यानंतर लगेचच निकाल घोषित केला जाईल. 
बारामती विधानसभा मतदारसंघातील 341657 मतदारांपैकी 233286 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 68.28 टक्के मतदान झाले आहे. यंदा मतदानाचा टक्का घटल्याने त्याचा कोणाला फायदा होतो की कोणाला तोटा हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. 

दरम्यान, वखार मंडळाच्या गोदामासह संवेदनशील गावांमध्येही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली. युवकांनी जल्लोष करताना कायदा व  सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. 

अजित पवार व गोपीचंद पडळकर यांच्यात लढत-
राष्ट्रवादीचे अजित पवार व भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्यात मुख्य लढत होणार असून अजित पवार मताधिक्याचा विक्रम घडवितात की गोपीचंद पडळकर मतांचा विक्रम करतात या कडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result pune beramti trends early morning