दौंड : राहुल कुल यांची थाेरातांवर आघाडी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

सध्या मतमाेजणीस सुरवात झाली असून राहुल कुल (भाजप)- 7853 तर रमेश थोरात (राष्ट्रवादी) - 3243 एवढी मते मिळाली असून, कुल यांनी आघाडी घेतली आहे. 

दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीमुळे भाजप उमेदवार तथा विद्यमान आमदार राहुल कुल आमदारकी राखणार का राष्ट्रवादीचे उमेदवार तथा माजी आमदार रमेश थोरात पुन्हा आमदार होणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या मतमाेजणीस सुरवात झाली असून राहुल कुल (भाजप)- 7853 तर रमेश थोरात (राष्ट्रवादी) - 3243 एवढी मते मिळाली असून, कुल यांनी आघाडी घेतली आहे. 

दरम्यान, १९९० पासून २००९ दरम्यान झालेल्या सहा निवडणुका भाजपने लढविलेल्या आहेत, परंतू त्यांना खाते उघडता आले नसल्याने यंदा राहुल कुल यांच्या रूपाने तरी कमळ फुलणार का पुन्हा रमेश थोरात घड्याळाची टिकटिक करणार का ? याविषयी संभ्रम कायम आहे. 

यंदा मुख्य लढत आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांच्यामध्ये झाली. त्याशिवाय बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष असे एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. मतदारसंघातील ३,०९, १६८ मतदारांपैकी २१२४१५ मतदारांनी मतदानाचा (६८.७१ %) हक्क बजावला आहे. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात व सन २००२ पासून सलगपणे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद भूषविणारे राहुल कुल या प्रतिस्पर्ध्यांमधील ही तिसरी विधानसभेची निवडणूक आहे. २००९ मध्ये अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे उमेदवार असलेले राहुल कुल यांचा १७४४२ मतांच्या फरकाने पराभव केला होता.

दरम्यान, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीमधून निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेणारे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश थोरात यांचा ११३४५ मतांच्या फरकाने पराभव केला होता. दहा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून यंदाच्या निवडणुकीत राहुल कुल यांनी भाजपचे उमेदवार म्हणून तर रमेश थोरात यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मतदारांना कौल मागितला असून, मतदार नेमकं कोणाला कौल देतात?, याविषयीची उत्कंठा शिगेला पोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Pune daund trends early morning