"शिवशाही' चा डाव आम्ही उधळून लावू ; प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया

संजय साळुंखे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

खासगी ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हा निर्णय घेतला असून, तो प्रवाशांसाठी मारक आहे. दररोजच्या प्रवासासाठी "लालपरी'च योग्य आहे. त्यामुळे सातारकर हा खासगीकरणाचा डाव हाणून पाडतील, असा इशाराही प्रवाशांनी दिला आहे.
 

सातारा : सातारा- पुणे विनावाहक- विनाथांबा बससेवेची मागणी नसतानाही "शिवशाही'च्या फेऱ्या वाढवण्याच्या निर्णयावर प्रवाशांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हा खासगीकरणाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे. सध्याच्या महामागाईच्या काळात "शिवशाही'चा प्रवास नक्कीच परवडणारा नाही, त्यामुळे सातारकर प्रवासी "शिवशाही' वाढवल्याचा डाव हाणून पाडेल, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.
 
साताऱ्याहून नियमित पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याचा विचार करून 2002 मध्ये सातारा- पुणे ही विनावाहक विनाथांबा बससेवा सुरू करण्यात आली. त्याला पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दर 15 मिनिटांनी ही बस सुटते. पहाटे सहा ते रात्री साडेआठ या वेळेत या बससेवेच्या एकूण 56 फेऱ्या सुटतात. पूर्वी सर्व फेऱ्यांसाठी या साध्या बस सोडण्यात येत होत्या.

त्यानंतर काही फेऱ्या निमआराम बसच्या सोडण्यात आल्या. नंतर त्या बंद करून "शिवशाही'च्या काही फेऱ्या लावण्यात आल्या. मात्र, दरातील 65 रुपयांच्या फरकामुळे प्रवाशांनी "शिवशाही'कडे पाठ फिरवली, तरीही चार दिवसांपासून साध्या बस कमी करून "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यावर प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

 

सामान्यांवर अतिरिक्त भुर्दंड 

एसटी महामंडळाचा तीव्र शब्दात निषेध. केवळ खासगी मालकांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सामान्य नागरिकांवर अतिरिक्त भाडेवाढ लादणे योग्य नाही. ज्या "लालपरी'ने तुम्हाला फायदा करून दिला. तिला दूर करून "शिवशाही' बस सोडणे योग्य नाही. 

सागर घोलप, सातारा. 

 

"लालपरी' जिवंत ठेवणार 

सर्वसामान्य माणसांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम चालू आहे. एसटीशिवाय पर्याय नाही, हे महामंडळाच्या लक्षात आल्याने "लालपरी' कमी करून "शिवशाही' बस लावल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे, हे योग्य नाही. खासगी मालकांचे उत्पन्न वाढावे, यासाठी नवीन एसटी बस आणल्या जात नाहीत. "शिवशाही' वाढवल्या जात आहेत. या निर्णयाचा वेळीच विरोध केल्यास आपली "लालपरी' जिवंत राहील.

सागर इंगळे , सातारा. 

 

"शिवशाही' परवडणारी नाही 

हा खासगी मालकाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. "शिवशाही'चा प्रवास हा सामान्यांना परवडणारा नाही हे एसटीच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावे. "शिवशाही' बस ही मुंबई, नाशिक अशा लांबच्या प्रवासाला ठीक आहे; पण पुण्याला प्रवासी रोज प्रवास करणाऱ्यांसाठी "लालपरी'च पाहिजे. 

दत्रात्रय साळुंखे , सातारा.

 

खासगीकरणाचा हा डाव 

"सातारा- स्वारगेट' सेवेत "शिवशाही' घुसडण्याचा घाट मांडला जात आहे. 105.6 किलोमीटरच्या प्रवासासाठी "शिवशाही' बसचा ताफा आणलाय. त्यासाठी प्रवासांकडून 65 रुपये जास्त लुटण्यात येत आहेत. सध्या पाच तिकिटे "लालपरी'ची विकली गेली, तर एक तिकीट "शिवशाही'चे विकले जाते. "लालपरी'ची कमतरता असेल, तर नाईलाज म्हणून गरजू प्रवासी "शिवशाही'चा पर्याय निवडतात. जे सुरळीत सुरू आहे, ते विस्कळित करायचे आणि नंतर सवडीने महामंडळ तोट्यात आहे, असे भासवून खासगीकरण करून सगेसोयऱ्यांचे कल्याण करायचे, असा डाव आहे. हे स्वप्न सातारकर जनता धुळीस मिळवून दाखवेल.

श्रीकांत गायकवाड , सातारा.

 

हा डाव उधळून लावू 

प्रवाशांच्या सेवेसाठी हे मूळ ब्रीद वाक्‍य एसटी महामंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून अंमलात आणून सर्व सामान्य प्रवाशांना प्रामाणिक सेवा दिली; परंतु गेल्या वर्षांपासून नवीन सुधारणा करण्याच्या नावाखाली एसटी महामंडळाने "लालपरी' आणि "हिरकणी' बसची नवीन बांधणी बंद करून "शिवशाही' नावाचा पांढरा हत्ती सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मारला आहे. प्रवाशांची गरज नसताना सातारा-स्वारगेट या मार्गावर जबरदस्तीने "शिवशाही' बस आणून प्रवाशांना वेठीस धरले आहे. प्रवाशांची गैरसोय करण्याचा मानस नक्कीच आम्ही उधळून लावू.

 

प्रवीण जमदाडे , सातारा.

 

महागाईत "शिवशाही' कशाला? 

चांगलं आठवतंय... सातारा-पुणे ही बस 18 डिसेंबर 2002 या दिवशी चालू झाली. त्या वेळी "लालपरी'ला दोन्ही बाजूला सातारा-पुणे-सातारा अशी जाहिरात व्हावी, म्हणून रंगविण्यात आले होते. त्या वेळी पासून मी या बसने प्रवास करतोय. पुणे- साताऱ्याला वेळेत सोडणारी "लालपरी' आम्हाला हवी आहे. आपण महागाईने वैतागलो असताना "शिवशाही'चा प्रवास नक्कीच परवडणारा नाही.

दीपक घाडगे , सातारा.

एसटीची ओळख म्हणजे "लालपरी.' तीच ओळख आज नाहीशी होताना दिसत आहे. पुण्याला जाण्यासाठी दोन तासांच्या प्रवासाला 200 रुपये म्हणजे रोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना रोजचा 400 रुपयाचा भुर्दंड आहे. हे नाटक पाहिजेच कशाला? 


 
 राहुल सुरेश खुडे , सातारा.

हेही वाचा - आम्हांला "शिवशाही' बस नकाे ; प्रवाशांची मागणी

प्रवाशांची आथिर्क लूट 

पहिल्या दिवसापासूनच सातारकरांनी "लालपरी'ला भरभरून साथ दिली. मात्र, आता या "लालपरी'ऐवजी "शिवशाही'च्या नावाखाली प्रवाशांची आथिर्क लूट होतेय. "शिवशाही' ही सर्वसामान्याला परवडणारी नाही. ती लांबच्या प्रवासासाठी ठीक आहे. सामान्य माणूस या "लालपरी'तून सुरक्षित आणि योग्य दारात ये-जा करू शकतो. दररोजच्या प्रवासासाठी "लालपरी'च पाहिजे.

मोहसीन पठाण , सातारा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers Are Not Ready To Accept Shivshai Bus Service From Satara To Pune