पिंपरीचे अग्निशमन दलाचे जवान हुतात्मा विशाल जाधवांना साश्रूपुर्ण नयनांनी निराेप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील जवानाच्या मृत्यूची ही पहिलीच घटना आहे. महानगरपालिका भवन येथे आज (साेमवार) त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांचे शव मूळगावी नेण्यात आले.

दहिवडी (जि. सातारा) : 'अग्निशमन दल जवान हुतात्मा विशाल जाधव अमर रहे'च्या जयघोषात साश्रूपुर्ण नयनांनी विशाल जाधव यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
रविवारी (ता. एक, डिसेंबर) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पिंपरीचे चिंचवड महानगरपालिका हद्दीतील फुगेवाडी उड्डाणपुल येथील दिन वसाहत येथील पंचवीस फुट खोल खणलेल्या खड्ड्यात तीन मजूर अडकले होते. या मजूरांना वाचविताना झालेल्या दुर्घटनेत पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील जवान आंधळी (ता. माण) येथील विशाल हणमंतराव जाधव (वय : 32 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

विशाल यांचे शिक्षण मुंबई येथे झाले व त्यानंतर सात वर्षापुर्वी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन दलात नोकरीस लागले. हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे विशाल यांचा मोठा मित्रसमूह होता. अचानक झालेल्या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला. आज (साेमवार) दुपारी चारच्या सुमारास विशाल यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी आंधळी (ता. माण) येथे आणण्यात आले होते. पार्थिव काही वेळ घरासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.

अंत्यविधीच्या ठिकाणी माणच्या प्रांताधिकारी अश्विनी सोनवणे, तहसीलदार बी.एस. माने, पिंपरी चिंचवडचे मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी मानवंदना देवून 'हुतात्मा विशाल जाधव अमर रहे'च्या घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही विशाल जाधव अमर रहे च्या घोषणा दिल्या. 

हेही वाचा : मजूराचा पाय बाहेर खेचणार तेवढ्यात आम्ही देखील गाडले गेला...

विशाल यांच्या बंधूने पार्थिवास मुखाग्नी दिला. त्यानंतर मान्यवरांनी मनोगतं व्यक्त करुन श्रध्दांजली वाहिली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, दादासाहेब काळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल यांच्या पश्चात पत्नी प्रियांका, दोन वर्षांची मुलगी आराध्या, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation Fire Brigade Officer Vishal Jadhav Martyr Last Ritiuvals