पुण्यातील महिलेस महाबळेश्वरात अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

योजनांचा लाभ मिळवुन देण्याच्या बहाण्याने अनेकांना लटुले ; तिच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे.

महाबळेश्‍वर : शासकिय घरकुल योजना, आटाचक्की, शिलाई मशिन, भविष्य निर्वाह निधी आदी योजनांचा लाभ मिळवून देते, असे सांगून महाबळेश्‍वर, वाई, पाचगणीसह तापोळा परिसरातील अनेकांना पंचवीस ते पन्नास लाख रुपयांचा गंडा घालून पलायन करण्याच्या प्रयत्नात असलेली महिला मंगल रवि मोरे (वय 46, रा. विठ्ठलवाडी, जकातनाका, पुणे) (सध्या रा. नगरपालिका कर्मचारी गृहनिर्माण सोसायटी, महाबळेश्‍वर) हिला स्थानिक नागरीकांनी सतर्कता दाखवून गुरेघर परिसरातून पकडून आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.

 
याबाबतची अधिक माहिती अशी -ः संबंधित महिला साधारण वर्षभरापुर्वी महाबळेश्‍वर येथे राहण्यास आली. त्यासाठी तिने येथील नगरपालिका सोसायटीमध्ये भाडयाने घर घेतले. तेथे परिसरातील महिलांची ओळख वाढविली. मी व माझे पती पुण्यातच समाजसेवेचे काम करतो. पुण्यात आपण अनेकांना अनेक योजनांचा लाभ मिळवुन दिला आहे असे सांगून तिने महिलांकडून 10 हजारांपासून लाखो रूपये गोळा केले. तर प्रेरणा बचत गटाद्वारे आपण कर्ज देवू, असे सांगून अनेक महीलांना गंडा घातला आहे. केवळ सहा महिन्यात तिने अनेकांना गंडा घालुन लाखो रूपयांची फसवणुक केली.

सहनशिलतेचा बांध सुटला 

दरम्यान काही लोकांनी काम होत नाही असे पाहुन तिच्याकडे जमा केलेल्या पैशांची मागणी केली. परंतु दरवेळी काहीतरी बतावणी करुन ती लोकांना शांत करीत होती. परंतु अनेकांचा सहनशिलतेचा बांध सुटत चालला होता. अनेकजण तिला घरी येवुन शिविगाळ करून पैशाची मागणी करीत होते.
 
लोकांचा तगादा वाढल्यावर काल (शनिवारी) दुपारी तिने दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने महाबळेश्वर सोडले. ही माहिती काही महिलांना समजताच त्यांनी आपल्या पतींना कळविले. त्यानुसार माहिती घेवुन ती महिला ज्या गाडीत गेली, त्या गाडीला गाठून अर्ध्या रस्त्यातच तिला थांबवून ठेवले.

अन महाबळेश्वर पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान त्या महिलेला महाबळेश्वर येथे आणून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्या महीलेला काल चौकशीसाठी ताब्यात घेतले परंतु काल तिची प्रकृती बिघडल्याने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पुन्हा तिला महाबळेश्वर पोलस ठाण्यात आणुन तिची चौकशी सुरू केली.
 
संबंधित महिलेविरोधात आज महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अनिस वारूणकर, समरीत वारूणकर, कासम पन्हाळकर, शाहीद बढाणे, आदनान वारूणकर, फिरोज पन्हाळकर, सलिम सयद, आसिफ बढाणे, फरीद खारखंडे, ओसामा खान, अमोल काळे, राजश्री शिंदे, सुनिता पवार, पुजा लालबेग, नितीन जाधव, वंदना शेटे यांनी तक्रार दाखल केली.

अनेकजण तक्रार दाखल करण्यासाठी सरसावले

मंगल मोरे या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच वाई, पाचगणी व तापोळा येथूनही अनेकजण तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. परंतु महाबळेश्वर पोलीसांनी त्यांना आपल्या भागातील पोलिस ठाण्यात तुम्ही तक्रार दाखल करा असे सांगुन त्यांना परत पाठविले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक बी. ऐ. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्रीकांत कांबळे करीत आहेत. 

' तिच्या 'कडे अनेक नावांची ओळखपत्रे 

महाठग महिलेने पोलिसांना मंगल मोरे असे नाव सांगितले असले, तरी हे नाव तरी खरे आहे की नाही याची पोलिसांना खात्री नाही. तिच्या घराची झडती घेतल्यावर वेगवेगळया नावांची काही ओळखपत्रे तिच्याकडे आढळून आली आहेत. त्यामुळे पोलिस सर्व बाजूंनी तिची चौकशी करीत आहेत. आज सायंकाळी पोलिसांनी तिला पालिका सोसायटीत आणले असता स्थानिक महिलांनी गर्दी करत तिला शेलक्‍या शब्दात शिवीगाळही केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune woman arrested in Mahabaleshwar