"शिवशाही'तून प्रवाशांची पाकीटमारी 

संजय साळुंखे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राज्य मार्ग परिवहन महामडंळाने साताराहून पुण्याला जाण्यासाठी असणारी विना वाहक विना थांबा बससेवेत बदल केल्याने प्रवाशांना आर्थिक भार साेसावा लागत आहे.

सातारा ः सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा बससेवेत दिवसभरात "शिवशाही'च्या तब्बल 16 फेऱ्या वाढवण्यात आल्याने प्रवाशांना दररोज 44 हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. महिनाभराचा विचार केल्यास हा आकडा 13 लाख 86 हजार रुपयांपर्यंत वाढतो. महामंडळाने प्रवाशांच्या मानगुटीवर जबरदस्तीने बसवलेले हे "शिवशाही'चे भूत किती नुकसान करणारे आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
 
राज्य मार्ग परिवहन महामडळाने "आरामदायी प्रवासासाठी' या गोंडस वाक्‍याखाली "शिवशाही' बससेवा सुरू केली. या बसमधून होणारा प्रवास आरामदायी असला, तरी तो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही, हे तिकीट दरावरून दिसते. त्यामुळे ही सेवा सुरू केल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच प्रवाशांनी "शिवशाही'कडे पाठ फिरवली, तरीही "वरिष्ठां'च्या आदेशानुसार "शिवशाही'चा विस्तार वाढतच आहे. सातारा-पुणे विनावाहक विनाथांबा बससेवेत "शिवशाही'च्या वाढवलेल्या जादा फेऱ्या हे त्याचेच उदाहरण आहे.

हेही वाचा -  पुणेकरांसह सातारकरांच्या खिशावर अतिरिक्त भार

तसे पाहिले तर सातारा विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारी ही सेवा. पहाटे सहापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत दर 15 मिनिटांनी पुणे (स्वारगेट) व साताऱ्यातून ही बस सुटते. दिवसभरात एकूण 58 फेऱ्या होतात. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार साध्या बसच्या (लालपरी) 40 व "शिवशाही'च्या 12 फेऱ्या होत्या. कालपासून बदललेल्या वेळापत्रकानुसार साध्या बसच्या 40 ऐवजी 28 फेऱ्या, तर "शिवशाही'च्या 12 ऐवजी 28 फेऱ्या सुरू करण्यात आल्या. साध्या बसच्या फेऱ्यांत कपात करताना "शिवशाही'च्या 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या. सहाजिकच त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना बसणार आहे.

 प्रवाशाला 65 रुपये जादा द्यावे लागतात

"सातारा-पुणे'साठी साध्या बसचा तिकीट दर 135 रुपये, तर "शिवशाही'चा दर 200 रुपये आहे. "शिवशाही'तून प्रवास केल्यास प्रत्येक प्रवाशाला 65 रुपये जादा द्यावे लागत आहेत. प्रत्येक बसमध्ये 43 सीट आहेत. तिकीट दरातील फरकाचा विचार केला तर प्रत्येक फेरीमागे "शिवशाही'ला 2 हजार 795 रुपये जादा उत्पन्न मिळत आहे. नवीन 16 फेऱ्यांचा विचार केल्यास "शिवशाही'ला दररोज 44 हजार 720 रुपयांचे जादा उत्पन्न मिळत आहे. महिनाभरातील जादा उत्पन्नाचा हा आकडा 13 लाख 86 हजार 320 रुपयांवर जातो. एकूणच ही आकडेवारी पाहता "शिवशाही'च्या माध्यमातून प्रवाशांची कशी पाकीटमारी सुरू आहे, हे लक्षात येते. 
 

हेही वाचा - कर्नाटकची महाराष्ट्रावर दादागिरी

"लालपरी'ने वाचतील दरमहा 25 लाख
 

साध्या बसच्या 28 फेऱ्यांतून दररोज 1 हजार 201 प्रवाशांनी प्रवास केल्यास 1 लाख 62 हजार 540 रुपयांचे, तर "शिवशाही'ला 2 लाख 45 हजार 616 रुपयांचे उत्पन्न मिळते. दोन्ही सेवांतील तिकीट दरातील फरकाची ही रक्कम 83 हजार 76 रुपये आहे. महिन्याचा हा आकडा 25 लाख 25 हजार 365 रुपयांवर जातो. सातारा विभागाने जर सातारा- पुणे सेवेसाठी साध्या बसच्या 56 फेऱ्या सुरू ठेवल्या, तर त्यातून प्रवाशांचे दरमहा 25 लाख रुपये वाचू शकतात. हा निर्णय घेण्यासाठी प्रवाशांचे हित पाहणारे "वरिष्ठ' व विभागीय नियंत्रकही असले पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsahi Bus Service Costs More