#SaathChal पावसाच्या साथीने लोकरंगांची उधळण

विलास काटे
शुक्रवार, 20 जुलै 2018

वेळापूर - हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी, टाळ-मृदंगांचा गजर म्हणजे वारी, भक्तीची कसोटी म्हणजे वारी, सहनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे वारी, तसेच लोकरंगांची उधळण म्हणजेही वारी... हे लोकरंगांचे अनोखे रूप गुरुवारी वेळापूरच्या माळरानावर पाहायला मिळाले. 

रिंगण, धावा आणि त्यानंतर रंगलेल्या भारुडांनी वेळापूरच्या परिसरात लोकरंगात न्हाहून निघाला. अंधश्रद्धेला जीवनातून हद्दपार करण्याबरोबरच जीवन अधिक डोळस पद्धतीने जगण्याचा बीजमंत्र घेऊन माउलींचा पालखी सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला. 

खांद्यावर भागवत धर्माची पताका घेऊन विठुरायाच्या चरणी आपली वारी रुजू करण्यासाठी निघालेल्या माउलींच्या सोहळ्यात लोकरंग कशाला म्हणतात, याची प्रचिती आली. परंपरेप्रमाणे वेळापूरजवळ ‘तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा’ असा घोष करीत लाखो वारकरी धावा बावी माउंटवरून धावत वेळापूरच्या दिशेने आले. पायी चालून थकली- भागलेली पावले त्या उतारावरून धावत होती. मनात कमालीचा आनंद घेऊन वैष्णव विठुरायाच्या समीप आल्याचा भाव व्यक्त करीत होते. धावा झाला आणि माउलींची पालखी उताराच्या खाली थांबली. रथापुढील शेडगे दिंडी क्रमांक तीनच्या वतीने मानाच्या भारुडात ज्येष्ठ भारुडकार लक्ष्मण राजगुरू यांनी वारीच्या वाटेवरील खरी वेडी कोण, याचे दर्शन घडविले. महादेव महाराज शेंडे यांनी गवळणी सादर करून भाविकांची मने जिंकली. प्रबोधन करीत रंगलेल्या भारुडातून वारकऱ्यांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न झाला. जीवनाचा खरा अर्थ भारुडकारांनी विषद केला. 

सकाळी रंगलेले खुडूस फाट्यावरील गोल रिंगण, धावा आणि भारुडांनी सारा दिवस भाविकांसाठी आनंदाचा ठरला. भुरभूर पावसात लोकरंगाचा आस्वाद घेतला. रात्री सोहळा वेळापूर मुक्कामी विसावला.

Web Title: #SaathChal palkhi wari rain sant dnyaneshwar maharaj