#SaathChal पालखी सोहळ्यावर पोलिसांची नजर

Police
Police

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

पालखी काळात विविध मार्गावरील वाहतुकीतही बदल करून त्याचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक अभिजित पाटील व लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांनी दिली. 
नीरा स्नानानंतर उद्या (ता. १३) दुपारी पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यानंतर पालखीचा लोणंद येथे दीड दिवसांचा मुक्काम आहे. सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी शहरात तसेच पालखी मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पाच पोलिस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ६० सहायक पोलिस निरीक्षक, ६२४ पुरुष व महिला पोलिस कर्मचारी, १०२ हवालदार, १२२ वाहतूक नियंत्रक असे एकूण ९२५ पोलिस अधिकारी व कर्मचारी, ३५० पुरुष व १५० महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी नेमले आहेत.

शहरात शासकीय व खासगी २५ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. खासगी वेशातील पाच पोलिस अधिकारी, ५० पोलिस कर्मचाऱ्यांचे फिरते पथक नेमले आहे. पालखी तळावर वॉच टॉवर लावले आहेत. मोबाईल पेट्रोलिंगसाठी कर्मचारी नेमले आहेत.

पालखी सोहळा काळात उद्या (ता. १३) सकाळी सहा वाजल्यापासून सर्वच मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. 

नीरा बाजूकडून लोणंदकडे येणारी वाहतूक रजतसागर हॉटेल, पाडेगाव पाटी, नेवसे वस्ती ते तरडगाव या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे.

फलटणहून लोणंदकडे येणारी वाहने साखरवाडी, बारामती व पुण्याकडे, तर साताऱ्याकडे जाणारी वाहतूक निंभोरे, ढवळ पाटीमार्गे आदर्की फाट्याकडे वळवण्यात येईल. खंडाळ्याकडून लोणंदकडे येणारी वाहने बिरोबावस्ती येथे, शिरवळ बाजूकडून येणारी वाहने शिरवळ नाका येथे अडवली जातील. 

प्रशासकीय यंत्रणा प्रमुखांना वॉकीटॉकी
जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पालखी सोहळ्यात कार्यरत असणाऱ्या विविध प्रशासकीय यंत्रणांच्या प्रमुखांकडे वॉकीटॉकी दिले आहे. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पाणीपुरवठा केंद्र, विश्रामगृह, पालखी तळ, वीज वितरण कंपनी, निर्मल वारी प्रमुख आदी २५ अधिकाऱ्यांना वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक देविदास ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com