#SaathChal भेटी लागे जीवा लागलीसे आस!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 July 2018

कोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता जिल्ह्यातून पंढरपूर पायी वारीला प्रारंभ होणार आहे. गावागावांतून वारकरी दिंड्या-पताकांसह कानडाऊ विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असून, उद्या (ता. ६) जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून काही वारकरी आळंदीकडे रवाना होणार आहेत. 

कोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता जिल्ह्यातून पंढरपूर पायी वारीला प्रारंभ होणार आहे. गावागावांतून वारकरी दिंड्या-पताकांसह कानडाऊ विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असून, उद्या (ता. ६) जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून काही वारकरी आळंदीकडे रवाना होणार आहेत. 

दरम्यान, १२ जुलैपासून पायी दिंड्यांना प्रारंभ होणार असून, यंदाच्या वारीत तरुणाईचाही उत्स्फूर्त सहभाग असणार आहे. रोज किमान पंचवीस ते तीस किलोमीटरचा पायी प्रवास करीत ही मंडळी पंढरपुरात पोचणार आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून निघणाऱ्या पंढरपूर पायी वारीला तीनशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सौंदलगासह कर्नाटक भागातील दिंड्या, येवती, निगवे खालसा, काहल म्हाळुंगे, मरळी, फुलेवाडी, चुये, कागल, पिंपळगाव, लिंगनूर आदी ठिकाणच्या दिंड्या १२ व १३ जुलैला बाहेर पडतील. शहरातील मोठी परंपरा असलेल्या उत्तरेश्‍वर पेठेसह शनिवार मंडप, कसबा बावडा येथील दिंड्यांचे प्रस्थान १५ जुलैला होईल. १२ ते १५ जुलै या काळात जिल्ह्यातील सर्व दिंड्यांचे प्रस्थान होईल.

पायी प्रवासाचे नियोजन
रोज किमान २५ ते ३२ किलोमीटरचा पायी प्रवास असे दिंडीचे नियोजन असते. साधारणपणे पहिल्या दिवशी २५, दुसऱ्या दिवशी ३२, पुन्हा दोन दिवस २५, नंतर २७ आणि शेवटच्या दिवशी ३२ किलोमीटरचा प्रवास करून दिंड्या पंढरपुरात पोचतात. प्रत्येक वारकऱ्याकडे अंथरूण, अंघोळीचे साहित्य, भजनासाठी टाळ, पाऊस आला तर अंगावर घेण्यासाठी प्लास्टिकचा कागद, औषधे, बॅटरी, पाण्याची बाटली, भजन मालिका आणि ज्ञानेश्‍वरी या गोष्टी आवश्‍यकच असतात. याबाबतची माहितीपत्रके आता सर्वत्र वितरित झाली असून, नोंदणी अंतिम टप्प्यात आली असल्याचे संदीप महाराज तळसकर सांगतात. 

अशीही विठूभक्ती
पंढरपूरच्या वारीत प्रत्येक जण आपापल्या परीने योगदान देत असतो. कुणी वारकऱ्यांसाठी अन्नदानाच्या ‘पंगती’ घालतो; तर कुणी पाणी व इतर साहित्याचे वाटप करतो. प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील रंगराव यादव हे असेच एक विठ्ठलभक्त. गेली २१ वर्षे ते वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. हा माणूस मूळचा मेस्त्री. दुचाकीसह ट्रॅक्‍टर दुरुस्तीचीही कामे करतो. लहानपणीच वडिलांनी पंढरपूरला नेऊन माळ घातलेली. घरी महिन्याच्या वारीची परंपरा. वडिलांच्या निधनानंतर मग रंगराव यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली आणि त्याचवेळी वारकऱ्यांसाठी पाण्याचा उपक्रमही सुरू केला. त्यासाठी आवश्‍यक ट्रॅक्‍टर, पाण्याची टाकी ते दुसऱ्यांकडून घेतात. त्यांच्या या विठ्ठलभक्तीला सलाम करताना अगदी मनात कसलीही शंका न ठेवता त्यांच्याकडे ट्रॅक्‍टर सोपविला जातो. काही विठ्ठलभक्तांकडून ऐच्छिक निधी घेऊन तो खर्च डिझेलवर करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 pandharpur Ashadhi wari